लातूर :एखादे काम होण्याची खात्री असणे किंवा विश्वास असणे समजू शकते .परंतु जे काम होणे अशक्य आहे त्याबाबतही विश्वास बाळगून तशी वक्तव्ये करणे याला आत्मविश्वास नव्हे खरे तर फाजील आत्मविश्वास म्हटले जाते .लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विजया संदर्भात आतापासूनच आ.अमित देशमुख करत असलेली वक्तव्य पाहता हा त्यांचा फाजील आत्मविश्वास असल्याचे जाणवत आहे. विशेष म्हणजे आ. देशमुख यांचा हा फाजील आत्मविश्वास लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्याची शक्यता आहे .
स्व. विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कार्यकर्तृत्वामुळे लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा विस्तार झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरची ओळख निर्माण झाली .परंतु विलासराव देशमुख यांचे निधन आणि नंतर आलेली मोदी लाट यामुळे हा बालेकिल्ला भुईसपाट झाला. लोकसभा निवडणुकीपासून याची सुरुवात झाली. मोदी लाटेत भाजपाचा उमेदवार विजयी झाला आणि नंतर एकापाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाकडे आल्या. त्यामुळे मागील काही दिवसात लातूर जिल्ह्यात भाजपाचा बोलबाला झाला. या पार्श्वभूमीवर आगामी काही महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे .सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यात आघाडी घेत काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत .लातूर येथे इच्छुकांकडून अर्ज स्वीकारल्यानंतर पुन्हा मुंबईत त्यांच्या मुलाखती झाल्या .
या मुलाखतीनंतर आ. अमित देशमुख यांनी केलेले वक्तव्य राजकीय अपरिपक्वता दाखविणारे आहे .लोकसभा निवडणूक लढवु इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे . पक्ष कोणता का असेना आपण उमेदवार असावे अशी अनेकांची इच्छा आहे .सर्वात पहिल्यांदा काँग्रेसची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे 49 जणांनी अर्ज केले. इच्छुकांची संख्या पाहता आ.देशमुख कदाचित भारावून गेले असावेत. यामुळेच त्यांना येणाऱ्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार होणार असल्याचे स्वप्न दिवसाच पडले .यातूनच त्यांनी काँग्रेसचा विजय आजच निश्चित असल्याचे वक्तव्य केले असावे असे जाणवते .
2014 सालापासून देश व राज्यात मोदी लाट कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात ,देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात, पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात भाजपाचे कामकाज सुरू आहे .मागील साडेचार वर्षात देश, राज्य आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. काँग्रेस राजवटीच्या साठ वर्षात झाली त्यापेक्षा अधिक गतीने कामे सुरू आहेत .यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी होणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे .असे असतानाही केवळ इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता काँग्रेस विजयी होणार असल्याचे भविष्य वर्तवणारे ज्योतिषी ,आ अमित देशमुख यांचे वक्तव्य मनाला न पटणारे आहे .देशमुख यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी असे वक्तव्य केले असेल हे समजू शकते.
परंतु आपल्या सैनिकांचा उत्साह वाढविताना सेनापतीने वास्तवाचे भान राखणे आवश्यक असते .ते न राखता, तयारी न करता रणशिंग फुंकणे हा आत्मघात ठरतो. लातूर जिल्हा आणि लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची आजची अवस्था पाहता हा आत्मघातच असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीदेखील आ. अमित देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचेच कार्यकर्ते उलटसुलट चर्चा करू लागले आहेत. विजयाची सुतराम शक्यता नसताना अपरिपक्व विधाने करून आ.अमित देशमुख हे काँग्रेस पक्ष किती घाबरलेल्या अवस्थेत आहे हेच जणू दाखवून देत आहेत .यामुळे भाजपाचा विजय आणखी सोपा होणार असून काँग्रेसला आपला गड पुन्हा उभा करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार असल्याचे दाखवून देत आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment