वसमत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर गाळे बांधकाम करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी 22 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. या प्रकारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
वसमत शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा आहे. वसमत शहराची मोठी बाजारपेठ असून येथे दररोज परिसरातील सुमारे साठपेक्षा अधिक गावातील गावकरी विविध साहित्य, शेतीमाल खरेदी विक्रीच्या कारणामुळे येतात. त्यामुळे शहरात बाजारपेठ वाढीला मोठा वाव आहे. मात्र व्यापाऱ्यांसाठी व्यापारी गाळे नसल्याने नवीन दुकाने शहराच्या मध्यवर्ती भागात थाटणे कठीण झाले आहे.
मात्र याठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर गाळे बांधकाम केल्यास त्यातून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढेल शिवाय व्यापाऱ्यांसाठीही जागा उपलब्ध होऊन त्याचा फायदा शहरातसह तालुक्यातील गावकऱ्यांना होणार आहे. या संदर्भात कृषी सभापती राखोंडे यांनी मागील एक वर्षापासून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीच्या बैठकीतही मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालाच नाही.
मागील वेळी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रश्नावर निर्णय झाला नसल्याने त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या राखोंडे यांनी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले होते. दरम्यान, या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतल्याने हे उपोषण सोडण्यात आले.

No comments:
Post a Comment