मध्य प्रदेशही भाजपच्या ताब्यातून जाणार?

Wednesday, November 21, 2018


भोपाळः मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सट्टा बाजारातील सट्टेबाज सक्रिय झाले आहेत. महिनाभरापूर्वी येथील सट्टा बाजारात भाजप पुन्हा सत्तेवर येणार असल्याची चर्चा होती; मात्र आता अचानक सट्टेबाजारातही पारडे फिरले असून सट्टेबाजांनी काँग्रेसच्या बाजूने झुकते माप दिले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांत कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. जे भाजप समर्थक आहेत, ते कमळ फुलणार असल्याचे सांगत आहेत; तर काँग्रेस समर्थक हाताचा पंजा बाजी मारणार असल्याचा दावा करत आहे. निवडणुकीचा धुराळा उडत असताना आता सट्टाबाजारही तेजीत आला आहे. भाजपवर 10 हजार रुपयांचा सट्टा लावणार्‍या व्यक्तीला भाजप सत्तेवर आल्यानंतर 11 हजार रुपये मिळतील. काँग्रेसवर 4,400 रुपये सट्टा लावणार्‍याला 10 हजार रुपये मिळतील, असा दर सट्टेबाजारात महिनाभरापूर्वी होता; मात्र हा दर बदलला आहे. आता सट्टेबाज कोणता पक्ष किती जागा जिंकेल यावर सट्टा लावत आहेत.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठी निवडणूक होत आहे. सट्टा बाजारात काँग्रेसला 116 जागा मिळतील, तर भाजपला 102 जागा मिळतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. काँग्रेस आणि भाजपवर लावलेला सट्टा जिंकणार्‍या व्यक्तीला दुप्पट पैसे देण्याचे आमिष सट्टा बाजारात दाखविले जात आहे. निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या विजय, पराभवावर करोडो रुपयांचा सट्टा लावला जातो. हा काळाबाजार फोन, वेबसाईट्स आणि पच्या माध्यमातून चालतो. विशेष म्हणजे आता सट्टेबाजी हायटेक पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोचता येत नाही. सट्टेबाजीसाठी व्हॉटसप कॉलिंग सारख्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसच जिंकेल, असा दावा यापूर्वी सर्वंच वाहिन्यांच्या पाहण्यात करण्यात आला आहे. सट्टा बाजारातही राजस्थानध्ये काँग्रेसच जिंकेल, असा दावा केला आहे. आता मध्य प्रदेशही भाजपच्या हातून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment