शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची रिक्ते पदे तातडीने भरा - आ.सतीश चव्हाण

Thursday, November 22, 2018
औरंगाबाद- राज्यात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची हजारो पदे रिक्त असून ती तातडीने भरण्यात यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.22) विधान परिषदेत केली. आ.विक्रम काळे, आ.कपिल पाटील यांनी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या प्रश्नासंदर्भात सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीमध्ये आ.सतीश चव्हाण यांनी देखील सहभाग घेत ही मागणी केली.

शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची देखील पदे रिक्त आहेत त्याच काय? असा प्रश्न उपस्थित करत अनेक शाळांमध्ये आज शिपाई, लिपीकांची पदे रिक्त असून परिणामी त्यांची कामे शिक्षकांना करावी लागत असल्याचे सभागृहाच्या निर्दशानास आणून दिले. हाच प्रश्न शिक्षकांचा बाबत देखील असून अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने इंग्रजी विषय शिकवणार्‍या शिक्षकाला मराठी तर विज्ञान विषय शिकवणार्‍या शिक्षकाला गणित विषय शाळांमध्ये शिकवावा लागतो. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची रिक्ते पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सभागृहात केली.

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा आकृतीबंद उच्चअधिकार समितीमध्ये आता नक्की झाला असून त्याची लवकरच घोषणा केली जाईल. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍याची भरती लवकर झाली पाहिजे, योग्य विषयाला शिकवायला योग्य शिक्षक मिळाला पाहिजे यासंदर्भात शासन स्तरावर त्वरीत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment