लातूर :केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर एकेकाळी कॉंग्रेसचा गड असणारा लातूर जिल्हा भाजपाच्या पाठीशी उभा राहिला .राज्यात नागपूर नंतर लातुरने सर्वाधिक यश मिळवून दिले .या कारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानीही लातुरवर लक्ष केंद्रीत केले .मुख्यमंत्री झाल्यापासुन जेवढ्या वेळेला ते नागपुरला गेले कदाचित त्यापेक्षा अधिक वेळा ते लातुरला आले असतील. कॉंग्रेसची गढी नेस्तनाबुत करून भाजपाने आपली गुढी उभारली खरी पण याला दृष्ट लागावी तसे गटबाजी उफाळली .
मागील काही दिवसात नगरसेवकांचे बंड तसेच विविध कारणानी दुही उघड झाली आणि आताही चक्रव्यूह तयार करून तो भेदण्याचे आणि दुसऱ्याला अडकवण्याचे काम सुरू आहे. संभाजीराव पाटील यानी पालकमंत्री पद स्वीकारल्यापासुन जिल्हा भाजपामय झाला .विविध कार्यक्रम राबवून त्यानी कार्यकर्ते जोडले .तरुणांना सोबत घेतले . एक सामान्याचा नेता अशी आपली प्रतिमा जपत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी धडपड केली.
ही धडपड फलद्रूप होत असताना आणि निवडणूक तोंडावर आलेली असताना लातूर शहर ,ग्रामीण आणि औसा मतदारसंघ आणि तेथील कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. मुळात हे तीनही मतदारसंघ आज कॉंग्रेसकडे आहेत. हे मतदारसंघ खेचुन घेण्यासाठी पक्ष आणि नेते प्रयत्नात आहेत. असे असताना कसलेही धोरण न ठरवता केवळ स्वतःचे नेतृत्व थोपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .जनाधार नाही ,कार्यकते नाहीत आणि निवडून येण्याची खात्री नसताना तसेच पक्षाने निवडणूक लढविण्याचा आदेश दिलेला नसतानाही काहीजण तीन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करून काय साध्य होणार ?असा प्रश्न आहे .पालकमंत्र्यांचे नेतृत्व मान्य नसले तरी त्यांना उघड आव्हान न देता पक्षाला पोखरून काढण्याचे उद्योग सुरू आहेत .यामुळे 2019च्या निवडणुकीत काय होणार याची खात्री देणे कठीण आहे .
लातूर शहर मतदारसंघात कोण लढणार हे अजुन स्पष्ट नाही . ग्रामीणमध्ये रमेशअप्पा कराड यांचे नाव ठरलेले आहे. औसा मात्र अजुन कोण लढेल सांगता येत नाही . मागच्या वेळी लातुरात शैलेश लाहोटी तर औशात पाशा पटेल उमेदवार होते .या दोघांची अजुनही दावेदारी असु शकते. पण सध्या सारे काही शांत आहे . याच स्थितीचा फायदा घेत हा चक्रव्युह आखला जात आहे .औसा आणि ग्रामीणवर अधिक लक्ष देत एक एक मोहरा टिपला जात आहे. विशेष म्हणजे जे मोहरे टिपले जातात ते नेमके पालकमंत्र्यांचे विरोधक आहेत .
मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीत हाच प्रकार झाला .स्वतः पुढाकार घेणे समजू शकते पण इतराना वगळणे हा प्रकार चुकीचा असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. ही निवडणूक विविध कारणानी गाजली पण पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व आ . बसवराज पाटील हे दोघे खऱ्या अर्थाने धोरणी ठरले. दोघेही निवडणुकीपासुन अलिप्त राहिले .
जिल्ह्यात मात्र कार्यकर्ते आणि नेते गटबाजी करू लागले आहेत .यामुळे पुढे काय होणार हे सांगणे कठीण आहे .अशा स्थितीत पालकमंत्री संभाजीराव पाटील यांचे नियोजित कार्यक्रम सुरू आहेत .संपूर्ण जिल्हा ते पिंजुन काढत आहेत .विशेष म्हणजे अरविंद पाटील यांच्या रुपाने लक्ष्मणासारखा भाऊ पाठीशी असल्याने त्याना जिल्ह्यात फिरण्यास मोकळीक आहे. उच्च शिक्षण घेतलेले अरविंद पाटील मतदारसंघ सांभाळतात .सामान्य कार्यकर्त्याना आपुलकीने वागणूक देतात .
कुठलाही कार्यक्रम असो बारीक नियोजन करून तो यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा आहे .इंद्रप्रस्थ जलभुमी अभियान असो की अटल महा आरोग्य शिबीर याची यशस्विता केवळ अरविंद पाटील यांच्यामुळेच झाली. निवडणुकीत निवडुन न येणाऱ्या जागा त्यानी निवडुन आणल्या .सामान्य कार्यकर्त्याच्या घरी कुठल्याही कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते .कार्यकर्त्याना जोडुन ठेवण्याचे काम ते करतात. यामुळेच कसलाही चक्रव्यूह असला तरी तो भेदुन पुन्हा एकदा जिल्ह्यावर भाजपाचा झेंडा फडकणार यात कसलीही शंका नाही .अरविंद पाटील यांच्यासारखे योद्धे भाजपाकडे असल्याने पक्षाला कसलीही चिंता असणार नाही. तरीही असे चक्रव्यूह तयार होवु नयेत यासाठी पक्षाने काळजी घेण्याची गरज आहे .
मुळात कुठलाही पक्ष अथवा संघटना चालवणे हे कोणा एकाचे काम नाही किंवा पक्ष ही कोणाचीही मक्तेदारी नाही. ही सामुहिक जबाबदारी असते. यात प्रत्येकाने दुसऱ्याचे ऐकणे आवश्यक असते . कोणी फलंदाजी तर कोणी गोलंदाजी करणे गरजेचे असते. कोणाला चेंडू अडवून फील्डिंग करावी लागते .पण मीच फलंदाजी करणार असे होत नाही .दुर्दैवाने जिल्ह्यात सध्या असे होत आहे .याच कारणाने लातूर शहर मतदारसंघाची वाट लागली आहे .सामुहिक नेतृत्व ही संकल्पना अस्तित्वहीन झाली असुन पक्षाला बुरे दिन येत आहेत .यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात बाहेरुन होणारा हस्तक्षेप थांबविणे गरजेचे आहे हा हस्तक्षेप थांबला नाही किंवा ढवळाढवळ करणाऱ्याला समज दिली नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण कलुषित होणार आहे .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment