दुष्काळ यादीतून औंढा, वसमत वगळल्याचे आश्चर्य वाटते- राधाकृष्ण विखे पाटील

Wednesday, November 14, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
हिंगोली जिल्ह्यातील औंढा, वसमत तालुके दुष्काळ यादीतून कोणत्या निकषाप्रमाणे वगळण्यात आले आहेत, असा सवाल करत अधिकाऱ्यांनी चुकीची आनेवारी काढून पिक विमा कंपनीशी संगनमत केल्याचा आरोप करत वसमत, औंढा तालुका दुष्काळ यादीतून वगळल्याचे आश्चर्य वाटते, असे उद्‌गार राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 14 नोव्हेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना काढले. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील औंढा व कळमनुरी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हिंगोली दौऱ्यावर आले होते. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी शिवारात शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने रॅंडम राऊंडनुसार दुष्काळ जाहीर केला असून रॅंडम म्हणजे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी आयुक्त भापकर यांना भ्रमणध्वनीवरून औंढा, वसमत दुष्काळी यादीतून का वगळले अशी विचारणाही केली. केवळ चुकीची आणेवारी दाखवून शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी केवळ नदीकाठच्या गावांची पिक पाहणी करून तोच अहवाल शासनाकडे पाठविला आहे. 

डोंगराळ भागात प्रत्यक्ष पाहणी न झाल्याने वसमत, औंढा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आले नसल्याचेही ते म्हणाले. पिक विमा कंपनीचा फायदा करून देण्यासाठी अधिकारी व पिक विमा कंपनीने संगनमत केल्याचा आरोपही विखे पाटील केला. यावेळी कृषि अधिक्षक व्ही.डी.लोखंडे यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने लोखंडे यांनाही विखे पाटील यांनी खडसावले असून पाहणी दौऱ्यात तहसीलदार उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार यांना दुष्काळी परिस्थितीची विचारणा केली असता नायब तहसीलदारांची बोबडी वळली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विखे पाटील यांच्यासमोर जगण्या मरण्याचा संघर्ष मांडला. यावेळी खा.राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे पाटील, विखे पाटील कृषि परिषदेचे भागवत देवसरकर, शामराव जगताप, बापुराव घोंगडे, नंदु पाटील, कॉंगे्रस प्रवक्ते विलास गोरे यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दिवस मावळतीला आला असल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात शेतकऱ्यांशी संवाद झाला.

No comments:

Post a Comment