पैशाने लुडो गेम खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई बाळापूर पोलीसांची कार्यवाही, 58 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, November 22, 2018
आखाडा बाळापूर / प्रतिनिधी
बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हदगाव रोडवर चुंचा येथे काही व्यक्ती पैशाने मोबाईलवर लुडो गेम खेळत आहेत, अशी माहिती बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास बाळापूर पोलीसांनी कार्यवाही करत सात जणांना ताब्यात घेतले असून 58 हजार 60 रूपयांचा मुुद्देमाल जप्त केला आहे. लुडो गेम पैशाने खेळताना केलेली नांदेड परिक्षेत्रातील पहिलीच कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे.


21 नोव्हेंबर रोजी वारंगा फाटा येथे ईद-ए- मिलादुन्नबीची मिरवणुक संपल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चुंचा येथे हदगाव जाणाऱ्या रोडच्या बाजुला काही इसम मोबाईलवर लुडो गेम खेळत आहेत. व त्यावर पैसेही लावत आहेत. या माहितीच्या आधारे चिंचोलकर यांनी कर्मचारी शेख, चव्हाण, गोले यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास छापा मारला असता मोबाईलवर लुडो गेम खेळत असताना काही इसम आढळुन आले. पोलीसांनी पाहताच काहींनी धुम ठोकली तर पोलीसांनी यातील सात जणांना पकडले आहे. यामध्ये संजय परसराम मोहिते, सुनिल दतराव कनके, गणपत सिताराम पवार, परसराम हरसिंग जाधव, पांडुरंग संभाजी चंद्रवंशी, सय्यद आरेफ सय्यद करामतअली, रामराव शेषेराव शेळके यांच्यावर जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सहा मोबाईल, 30 हजार रूपये किमतीचे व नगदी 28 हजार 60 रूपये असा, एकूण 58 हजार 60 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणऱ्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखा ही बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांच्या पथकाने 19 नोव्हेंबर रोजी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार खेळताना 11 आरोपींवर गुन्हे दाखल करून 29 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. खुद्द पोलीस अधिक्षकही अवैध धंद्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सातत्याने बाळापूर ठाण्याअंतर्गत कार्यवाहीचा धडाका सुरू असला तरी छुप्या पद्धतीने जुगार मटका चालू असल्याचे दिसून येते. सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनीही अनेक ठिकाणी जुगार मटक्यावर धाडी टाकून अवैध धंद्याला आळा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.

No comments:

Post a Comment