हिंगोली / प्रतिनिधी
कळमनुरी तालुक्यातील सिंदगी जिल्हा परिषद सर्कलमधील प्रमुख मार्ग क्र. 8 पार्डी मोड ते कोंढुर या 9 कि.मी.चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात येतो. मात्र, कंत्राटदारांनी थातुर-मातुर रस्त्याची दुरुस्ती केली. याची चौकशी करावी व नवीन रस्ता करावा, या मागणीसाठी 23 ऑक्टोबर रोजी एक दिवशीय भजन आंदोलन करून जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांनी निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या भजन आंदोलनाला जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनीही उपस्थित राहून पाठींबा दिला. तसेच कॉंग्रेसचे शिक्षण सभापती संजय देशमुख, जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल, कृषि सभापती भानुदास जाधव, पंचायत समिती सदस्य गोपु पाटील, युवा नेते राम कदम आदींनी उपस्थित राहून या भजन आंदोलनाला पाठींबा दिला. टाळ, मृदंग, विना या चालीवर भजन आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान लावलेल्या विविध पोष्टरमधून हेच का अच्छे दिन हा सवालही उपस्थित करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात कळमनुरी तालुक्यातील सिंदगी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पार्डी मोड ते कोंढुर या 8 कि.मी. रस्ता हा सा.बां.च्या अंतर्गत येतो. सदर रस्त्याच्या दुरुस्तीकरिता सन 2017-18, 2018-29 दोन वर्षाच्या कामाचे टेंडर संबंधीत ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, ठेकेदारांनी सन 2017-18या वर्षात अर्धवट रस्ता केला आहे. मात्र, पावसामुळे यात आणखी भर पडली. रस्त्याची अत्यंत दुरावस्था होऊन खड्डे पडले आहेत. या मार्गावर कोंढुर, बिबथर, डिग्रस, पानवाडी, चिंचोर्डी, वंजारवाडी, पार्डी आदी गावांचे विद्यार्थी व विद्यार्थीनी शाळा महाविद्यालयात बसमधून ये-जा करतात. या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे बससेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे जि.प.सदस्य बाळासाहेब मगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरुन जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शिवसेना जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांनी 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. दरम्यान, सदरील काम पंधरा दिवसांत सुरू करण्यात येईल, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग कळमनुरीच्या वतीने देण्यात आल्यानंतर सदरील आंदोलन स्थगित करण्यात आले.

No comments:
Post a Comment