माफी मागितल्यावरच प्रीती झिंटा गुन्हा मागे घेणार

Tuesday, October 2, 2018

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चार वर्षांपूर्वी विनयभंग केल्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका नेस वाडिया यांनी उच्च न्यायालयात केली आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने या याचिकेची सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी घेण्याचे निश्चित करताना प्रीती आणि नेस या दोघांनाही न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश दिले आहेत.

 नेस वाडियाने माफी मागितली तर आपण गुन्हा मागे घेऊ, अशी भूमिका प्रीती झिंटाने घेतली आहे. परंतु, नेस वाडियाने माफी मागण्यास नकार दर्शवल्यामुळे प्रकरण लांबण्याची चिन्हे दिसत आहे.३० मे २०१४ रोजी वानखेडेवरील क्रिकेट सामन्यात मला गरवारे पॅव्हेलियनमध्ये पाहून नेस वाडियाने तिकीट वाटपावरून आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांदेखत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रीतीने आपली जागा बदलली. मात्र, नेसचे त्याने समाधान झाले नाही. त्याने सगळ्या टीम सदस्यांदेखत आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केले, असा आरोप करून प्रीती झिंटाने गुन्हा दाखल केला.

 मुंबई पोलिसांनी याची दखल घेऊन मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट इस्प्लानेय कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. आयपीसी कलम ३५४ म्हणजे हल्ला करणे, कलम ५०६ गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणे, कलम ५०९ विनयभंग करणे या कलमांअंतर्गत आरोपपत्र दाखल केले. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी प्रीतीच्या वतीने जर नेस माफी मागण्यास तयार असेल तर आपण खटला मागे घेऊ, अशी भूमिका प्रीतीने घेतली. मात्र, नेसच्या वतीने ॲड. आबाद फोडा यांनी प्रीतीच्या या भूमिकेवर जारेदार आक्षेप घेतला. केवळ प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्यासाठीच प्रीतीने हा आरोप केल्याचा त्यांनी दावा केला. दोघांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने यावर आता सामोपचाराने तोडगा काढा, असा सल्ला देताना या दोघांना ९ ऑक्टोबरला हजर राहाण्याचे आदेश दिले..

No comments:

Post a Comment