नांदेड / प्रतिनिधी
नायगाव विधानसभा मतदार संघातील नायगाव व धर्माबाद तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत समावेश करावा, अशा प्रकारचे निवेदन प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य राजेश संभाजी पवार व जि.प. सदस्या सौ. पुनम राजेश पवार यांनी निवेदनाद्वारे करुन याची प्रत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्री व विभागीय आयुक्तांना दिली आहे. तसेच पीक आणेवारी पद्धतीत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे, अशीही मागणी केली आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने दुष्काळी तालुक्याची जी यादी जाहीर केली त्यामध्ये फक्त उमरीचा समावेश आहे, असं सांगून निवेदनात नमूद केलं आहे की, नायगाव व धर्माबाद या तालुक्यांचा पण दुष्काळी यादीत समावेश होणं गरजेचं आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा पण यात समावेश करणं गरजेचं आहे, असंही मागणीत राजेश पवार व सौ. पुनम राजेश पवार यांनी केलेली आहे.
ते पुढं म्हणतात की, चुकीच्या पद्धतीने निष्कर्ष न काढता यासंदर्भात वस्तुस्थिीचा अहवाल दिला जावा त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होणार नाही, असंही यांनी नमूद केले आहे. दोन्ही तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे रब्बी पिके घेणे अशक्य होत चाललेले आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करुन शासनाने वास्तव परिस्थिती पाहून दुष्काळ तालुक्याच्या यादीत नायगाव विधानसभा मतदार संघातील नायगाव व धर्माबाद तालुक्याचा समावेश करावा, असंही नमूद केलं आहे.
पैसेवारी पद्धतीत सुधारणा गरजेची
राजेश पवार यांनी निवेदनात असं नमूद केलं आहे की, आणेवारी काढण्याची पद्धत ही चुकीची आहे. यासाठी अधिकात अधिक किंबहुना सज्जा न्याय पीक कापणी करुन आणेवारी काढली जावी. त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होणार नाही, असंही आपल्या निवेदनात पवार दाम्पत्यांनी नमूद केलेलं आहे.

No comments:
Post a Comment