मुंबई : प्रतिनिधी.
कृष्णा राज कपूर यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली. कृष्णा यांच्या निधनावर सलमान खान, आमिर खान आणि संजय दत्त यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक कलावंतांनी दु:ख व्यक्त केले.
कृष्णा यांच्या निधनावर सलमान खानने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. 'कृष्णा आंटी मी आणि माझी आई तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही,' असे सलमान म्हणाला. आमिरने राज कपूर यांचा 'चित्रपट निर्मितीचे चालते बोलते विद्यापीठ' असा उल्लेख केला. 'राज कपूर हे चित्रपट निर्मितीचे चालते बोलते विद्यापीठ होते, तर कृष्णा यांचे जीवन म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा वस्तुपाठ होता' अशा शब्दात आमिरने आपल्या भावना व्यक्त केल्या. पटकथा लेखक सलीम खान यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 'कृष्णाजी आपल्यातून निघून गेल्या. फार वाईट वाटले. कृष्णाजी म्हणजे साक्षात देवीच होत्या. त्यांच्यासारखी माणसे देव पुन्हा पुन्हा घडवत नाही,' असे ट्विट सलीम खान यांनी केले. कृष्णा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या, असे संजय दत्त म्हणाला.
'कृष्णाजी या माझ्या परिचयातील सर्वात प्रेमळ स्त्री. सुदैवाने मला त्यांचा सहवास लाभला. त्या स्मृती मी कधीही विसरू शकत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. कपूर कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे,' असे संजय दत्त म्हणाला. चित्रपट निर्माता करण जोहर, रिद्धिमा कपूर साहनी, सोहा अली खान, अभिनेत्री रवीना टंडन, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांसारख्या बॉलीवूड कलावंतांनीदेखील अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत..

No comments:
Post a Comment