आरबीआय रेपो दरात वाढ करणार?

Tuesday, October 2, 2018

नवी दिल्ली
रुपयाच्या मूल्यात अत्यंत वेगाने होत असलेल्या घसरणीमुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे ती रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात पाव टक्का वाढ करून कर्जे महाग करू शकते, असा अंदाज देशातील अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

चालू आठवड्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीत व्याजदरवाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास व्याजदरवाढीची हॅटट्रिक नोंदवली जाईल. सध्या देशांतर्गत बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा अभाव असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे ते संतुलन साधण्याचे मोठे संकट रिझर्व्ह बँकेसमोर उभे ठाकले आहे. द्वैमासिक पतधोरणाचा आढावा येत्या गुरुवारी (४ ऑक्टोबर) जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर व्याजदरात ०.२५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकीकडे देशातील महागाईचे प्रमाण कमी झालेले असतानाच कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. 'आयसीआयसीआय बँके'चे मार्केट हेड बी. प्रसन्ना म्हणाले, 'गेल्या काही दिवसांमध्ये महागाईचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, अमेरिकेसह अन्य देशांमध्ये वाढते व्याजदर आणि मजबूत होणारा डॉलर पाहता आपल्याकडील दरांमध्येही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजात वाढ केली नाही, तर जगभर भारत आर्थिक बाबतीत पिछाडीवर असल्याचा संदेश जाईल.' इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या उगवत्या अर्थव्यवस्थांनीही आपले चलन मजबूत करण्यासाठी व्याजदरात वाढ करण्यावर भर दिला आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नाणेधोरण आढावा समितीने लागोपाठ दोन वेळा रेपो दरात वाढ केल्यानंतर सध्या हा दर ६.५० टक्के झाला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राज यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यामुळे देखील महागाई वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आरबीआय आधीच बचावात्मक पवित्रा घेऊ शकते. कदाचित पाव टक्का व्याजदरवाढ होईल. रुपयाची घसरण झाल्यामुळे देखील आरबीआय व्याजदरात वाढ करू शकते. एचडीएफसीचे उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी के. मिस्त्री यांनी देखील रुपयाची सद्य स्थिती पाहाता आरबीआय व्याजदरात पाव टक्का वाढ करेल, असे मत व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment