पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह ; जुगारातील ८ आरोपींवर गुन्हा दाखल

Monday, October 15, 2018

आखाडा बाळापूरची बिहारकडे वाटचाल

प्रतिनिधी / हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथे दि.१३ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जुगार खेळणाऱ्या आठ आरोपींना बाळापूर पोलिसांनी अटक करून ठाण्यात आणले होते. ही माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोढांरे यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह ठाण्यात जाऊन जुगारातील आरोपींना सोडवले व गोंधळ घातला या प्रकरणी आखाडाबाळापुर ठाण्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोढांरे यांच्यासह 80 ते 100 लोकांवर व जुगार खेळणाऱ्या आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी पोलिसांच्या विरोधात १४ ऑक्टोंबर रोजी सकाळी  बाळापुरात पोलिसावर  कार्यवाही करावी या मागणीसाठी रास्ता रोको केला.

गेल्या कित्येक दिवसांपासून  ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत  यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाचा पाऊस पडत होता. पण गेल्या काही दिवसांपासून पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ओंकांत चिंचोलकर यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून आखाडा बाळापूर येथील चौकातील दुर्गा मंडळाच्या बाजूला रस्त्याच्या कडेवर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटशे केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जुगार यांना रंगेहात पकडले. जुगार खेळणाऱ्यामध्ये गजानन जाधव, उत्तम धांडे, राजू गिरी, लक्ष्मण बोंढारे, मंगेश दुर्गे, अजय अग्रवाल, शाम व्यव्हारे, शिवचरण गोयंका या आरोपींकडून पोलिसांनी ३३ हजार ५८० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले होते. 

पोलिसांनी आरोपींना पकडून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आणले. परंतु याबाबत आखाडा बाळापूर येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यावर चाल केली. संजय बोंढारे यांच्यासह राजू अग्रवाल, विलास अमिलकंठवार, दीपक दुर्गे, कुशल अग्रवाल व इतर १०० लोकांनी पोलीस ठाण्यात रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत हैदोस घालून पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींना जबरदस्तीने सोडून आणले. तसेच यावेळी आरोपींनी जुगार प्रकरणी पोलिसांनी तयार केले सर्व कागदपत्रे फाडून टाकल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. तर या घटनेनंतर रात्री वसमत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरन काशीद यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले असून त्यांना मात्र अटक केली नाही. रविवारी सकाळी काँग्रेसचे संजय बोंढारे आणि कार्यकर्त्यांनी नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली.

 तसेच काँग्रेसच्या वतीने आखाडा बाळापुर बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु व्यापाऱ्यांनी काँग्रेसच्या आवाहन धुडकावून आपापली दुकाने, अस्थापना सुरूच ठेवल्याने आंदोलन करते चांगलेच तोंडघशी पडले. आरोपींवर गुन्हे दाखल असताना सुद्धा आरोपींनी रविवारी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे पोलिसांची कारवाई लुटूपुटूची आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांवर राजकारणी नेत्यांनी दबाव टाकल्यामुळे आरोपींवर वेळेत गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याकारणाने खुद्द आमदारांनी उपोषण करून लक्ष वेधले होते. आता बाळापुर पोलीस कारवाई करत असताना राजकीय मंडळी पोलिसांवर दबाव टाकून जुगारातील आरोपींना सोडण्याची मागणी करण्यासाठी चक्क रास्ता रोको, बंद अशा प्रकारे पोलीस प्रशासनाला वेठीस धरत आहे. यामुळे बाळापुर पोलिस ठाणे अंतर्गत कायदा व सुव्यस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अशा घटनेला वाव मिळत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. एकंदरीत आखाडा पुढची वाटचाल बिहारकडे होते की काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आहे.

दोन्ही प्रकणातील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल - पोलीस अधीक्षक
ठाण्यात येऊन गोधळ घालणाऱ्या वर जुगार खेळणाऱ्या दोन्ही प्रकरणातील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास सुरू आहे. अशी प्रतिकिर्या जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दैनिक मराठवाडा नेताला बोलतांना दिली.

पोलिसांची मवाळ भूमिका
जुगारातील आरोपींना अटक केले म्हणून शंभर ते दीडशे लोकांचा जनसमुदाय पोलीस ठाण्यात येतो, पोलिसांशी हुज्जत घालतो, जुगारातील आरोपींना सोडून नेतो, याउपरही कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी रास्ता रोको करतो. हे सगळे होत असताना एकंदरीत पोलिसांची संबंधित प्रकरणातील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असले तरी, पोलिसांची भुमिका अतिशय मवाळ असल्याची चर्चा आता रंगत आहे.

No comments:

Post a Comment