लातूर बंद मध्ये सहभागी होण्याचे अमित देशमुख यांचे आवाहन

Sunday, September 9, 2018

लातूर प्रतिनिधी: देशाला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवार दि.१० सप्टेंबर २०१८ रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. या बंद मध्ये तमाम लातूरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

या संदर्भाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या मंडळींनीच ते अधिक महाग केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झालेले असताना देशात ते वाढविले जात आहेत. यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. सामान्यांचे जिने अवघड झाले आहे. इंधन दर वाढीची प्रत्येक क्षेत्राला झळ पोहचली आहे. त्यामुळे ही अन्यायकारक दर वाढ कमी करावी म्हणून शासनावर दबाव वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आयोजन केले आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देत बंद पाळतील अशी अपेक्षा आहे.

लातूर बंद दरम्यान कोणालाही, शासकीय, खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, कोणालाही इजा पोहचणार नाही याची दक्षता घेत काँग्रेस कार्यकर्ते बंद यशस्वी करतील, असेही आमदार अमित विलासराव देशमुख प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment