हिंगोली / प्रतिनिधी
साहेब निसर्गाने साथ सोडल्यामुळे यावर्षी सोयाबीन ऐवजी कापूस लावला. पण बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झाले असून गेल्या एक ते दिड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने तुरीच्याही तुऱ्हाट्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे जीणे आता अवघड झाले असून शेतकऱ्याला केवळ सरकारच मायबाप आहे, अशी व्यथा हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील एका महिलेने दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यासमोर मांडली.
पालकमंत्री दिलीप कांबळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील गावांना भेटी देण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन 19 व 20 ऑक्टोबरला करण्यात आले होते. पहिल्या दिवशी 10 गावांना तर दुसऱ्या दिवशी 5 गावांना ते भेटी देणार होते. शुक्रवारी सकाळी 10 ते 1 पर्यंत पहिल्या टप्यात संतुक पिंपरी, राहोली, केसापूर, काळकोंडी, नवलगव्हाण या गावांना त्यांच्या भेटीचे आयोजन केले होते. परंतू, पालकमंत्र्यांचे हिंगोलीच्या विश्रामगृहात सकाळी 10.30 वाजता आगमन झाले. त्यानंतर ते संतुक पिंपरीला जाणार होते. मात्र, अचानक त्यांनी पहिली भेट जिल्हाधिकारी कार्यालयात देवून पंतप्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपली हजेरी लावली.
पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. ते थेट गणपत झिपरगे यांच्या शेतावर पोहोचले. या शेतकऱ्याकडे दिड एकर जमिन असून त्यामध्ये सोयाबीन व कापूस ही दोन पिके घेतली. सोयाबीनची समोर लावलेली गंजी दाखवत यामध्ये फार तर दोन पोते सोयाबीन होईल. कापूसाच्या बोंडीवर मात्र किड पडल्याने ते गळून पडत आहेत. त्याला आता पाते शिल्लक नसल्याने कापसाची अपेक्षा उरली नाही. पालकमंत्री पाहणी करण्यासाठी येणार आहेत. आता भिस्त मायबाप सरकारवरच असल्याची व्यथा त्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली. याचप्रमाणे त्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजुला गंगा गिरी, भगवान गिरी यांचे दिड एकर शेत असून त्यांनी कापूस व तूर घेतले. या शेतकऱ्यांची अवस्था सुद्धा वाईट आहे. पालकमंत्र्यांनी या ठिकाणी दहा ते पंधरा मिनीट शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढे राहोलीकडे मार्गक्रम केले.
राहोली येथील बळीराम धोंडबा बोरकर यांच्याकडे पाच एकर जमिन असून त्यांनी तूर व सोयाबीन पिक घेतले. या शेतात पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी.तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपा नेते रामरतन शिंदे नगरसेवक गणेश बांगर हे पोहोचले. यावेळी धोंडबा बोरकर यांनी दिड बॅगला एक चुंगडे सोयाबीन झाले. तूर वाळत असून तुरीच्या झाडाला फुलाचा पता नाही. आपल्या शेतातील परिस्थितीवर पालकमंत्र्यांसमोर आता शासनानेच शेतकऱ्याला मदत करावी अशी, व्यथा मांडली असता शेतकऱ्याच्या पाठीवर हात टाकून शासन शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्या शेतकऱ्याला पालकमंत्र्यांनी दिला.
त्यानंतर पालकमंत्र्यांनी केसापूर येथील हरीभाऊ राघोजी खंदारे यांच्या शेतात पोहोचले. 30 गुंठे जमिन असून त्याने सोयाबीन व तूरीचे पिक घेतले. त्याला दिड पोते सोयाबीन झाले. तर तूरीचे पिक हाती येण्याची शक्यता नसल्याची व्यथा त्याने पालकमंत्र्यासमोर व्यक्त केली. यावेळी पालकमंत्र्यांनी 23 ऑक्टोबरपर्यंत वस्तुनिष्ट अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. 30 ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा करतील हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
No comments:
Post a Comment