हिंगोली लोकसभा क्षेत्रात दुष्काळ जाहिर करा-खा.राजीव सातव

Saturday, October 20, 2018



 हिंगोली/प्रतिनिधी 
खरीप हंगामात उत्पादन खर्च देखील निघण्याची शक्यता नसतांना पाण्याअभावी रब्बीची अपेक्षाच करताच येत नसल्याने लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहिर करा अशी मागणी खा.राजीव सातव यांनी सामाजीक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे केली आहे. 
हिंगोली लोकसभा क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. खरीप पिके धोक्यात आली असुन, रब्बीच्या पेरणीपासून शेतकरी वंचित राहिला आहे. जनावरांसाठी चारा टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. कर्जमाफीत अजुनही मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत. मागील वर्षीचे बोंडअळीचे अनुदान देखील शेतकर्यांना मिळालेले नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना मदतीसाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापपर्यंत खरेदी केंद्र सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले असून शेतकर्यांना आपला माल मातीमोल भावाने खुल्या बाजारात विकावा लागत आहे. लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून सुद्धा प्रशासनाच्या वतीने चुकीची आणेवारी सादर केली असल्यामुळे शेतकर्यांना पीक विमा पासून वंचित रहावे लागणार आहे. एकंदरीत शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाची मदत न मिळाल्यास शेतकर्यांसमोर आत्महत्या करण्या शिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे सर्व बाबीचा तपशीलवार विचार व्हावा व संपूर्ण हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

No comments:

Post a Comment