हिंगोली / प्रतिनिधी
काळ्या बाजारात जाणारे सुमारे साडेबारा हजार लिटर रॉकेल कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे शुक्रवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास पकडण्यात आले. ही कारवाई कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले.
या कार्यवाहीत ३६ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आखाडा बाळापूर ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी आरोपी विजय कुमार संजय कुमार अग्रवाल यांच्यावर जीवनावशक्य वस्तू कायद्या अंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, पाचपुते, सावंत, डाखोरे, क्षीरसागर, बेले, अव्वल कारकून हिवरे आदी या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास वारंगाफाटा येथील एका गोदामावर धाड टाकली. त्यावेळी एम.एच.३८ डी १३१ क्रमांकाच्या टॅंकरमधील रॉकेल २०० लिटरच्या लोखंडी टाक्यात साठविले जात होते. पथकातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संशय बळावल्याने गोदामातील रॉकेलसाठा तसेच इतर बाबी तपासण्यात आल्या.
त्यावेळी प्रत्येकी २०० लिटरच्या ३७ टाक्या तसेच एक पाच हजार लिटर रॉकेलचे टॅकर असे एकूण १२ हजार ४०० लिटर रॉकेल आढळून आले. रॉकेलची किंमत ६ लाख २० हजार रूपये असून, टॅंकरसह ३६ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रॉकेलचे टॅंकर आखाडा बाळापूर ठाण्यात लावण्यात आले आहे तर गोदाम सील करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. याप्रकरणी आखाडा बाळापूर ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने रॉकेलच्या काळ्याबाजारावर केलेली ही कारवाई थांबवण्यासाठी राजकीय दबाव आल्याची चर्चा सुरू आहे. वारंगा येथे ही कारवाई सुरू असताना बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओंकार चिंचोलीकर उपस्थित होते. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील रेशनचे धान्य, रॉकेलचा काळाबाजार बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे या कार्यवाहीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गत पंधवड्यापुर्वीच एका आडत्याच्या दुकानात रेशनचे धान्य पकडले होते. त्यानंतर तब्बल १२ हजार ४०० लिटर रॉकेल साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment