सुनामीनंतर इंडोनेशियात ५००० जण बेपत्ता

Sunday, October 7, 2018

जकार्ता :नैसर्गिक प्रलयाच्या आठवडाभरानंतरदेखील या भागातील मृत्यूची भीती ओसरली नाही. सुलावेसी बेटावरील मृतांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. आतापर्यंत येथून १७६३ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. 
ढिगाऱ्याखालून कुजलेल्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडत असल्याने नुकताच या ठिकाणी आरोग्यविषयक इशारा जारी करण्यात आला आहे. ढिगाऱ्याखाली किती जण गाडले गेले, हे सांगणे कठीण असल्यामुळे बेपत्ता असलेल्यांचा आकडादेखील वाढण्याची शक्यता आहे.  विनाशकारी भूकंप आणि सुनामीच्या तडाख्यातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या इंडोनेशियाच्या पालूमध्ये अद्यापही ५००० जण बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 एकंदर भयावह स्थिती पाहता मृतांचा आकडादेखील वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शोध अभियानाचे काम व्यापक पातळीवर सुरू आहे. मात्र, ११ ऑक्टोबरपासून हे शोध अभियान थांबविले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरावो नुग्रोहो यांनी दिली; पण मर्यादित स्वरूपातील बचाव अभियान सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment