अभिनेत्याप्रमाणे शरीरयष्टी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आजकाल प्रत्येकालाच फिट रहायची इच्छा असते. म्हणूनच जीममध्ये जाणाऱ्यांची, डाएट करणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही. त्यामुळे फिटनेस ट्रेनरना सर्वत्र भरपूर मागणी आहे. या क्षेत्रात तुम्ही उत्तम करिअर घडवू शकता.
या क्षेत्रात संधींची अजिबात कमतरता नाही. फिटनेसचं क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. त्यातच शहरी भागात जीवनशैलीशी संबंधित विकारांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याकडे लक्ष देण्याचं प्रमाण बरंच वाढताना दिसत आहे. तरुणांमध्येही फिटनेसबाबत जागरूकता वाढताना दिसते आहे. सरकारी तसंच खाजगी क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात. पुरेशा अनुभवानंतर तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. वैयक्तिक सल्लागार म्हणूनही काम करता येईल. फिटनेस ट्रेनर म्हणून तुम्ही वेगवेगळ्या भूमिका पार पाडू शकता.
फिटनेस ट्रेनर बनण्यासाठी तुम्हाला स्वत:ला फिटनेसची विशेष आवड असणं गरजेचं आहे. तुम्हाला फिटनेसचं महत्त्व असायला हवं. फिटनेस ट्रेनर बनण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची गरज असतेच असं नाही; पण फिटनेसबाबतचे काही अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. इंदिरा गांधी इ्स्टिटट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्स, नवी दिल्ली, लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांसारख्या संस्थांमधून शारीरिक शिक्षणासंबंधीचे अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करू शकता. यासह फिटनेसविषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत. डाएट अँड न्यूट्रिशनचा अभ्यासक्रमही तुम्ही करू शकता. या क्षेत्राचा सखोल अभ्यास करण्याची तयारी असेल तर पीएचडीही करता येईल.

No comments:
Post a Comment