तब्बल १ कोटी ६३ लाखाचा गुटखा जप्त

Saturday, October 13, 2018
लातूर ला पॅकिंग साठी येणार होता हा सर्व गुटखा 

आखाडा बाळापुर/ विठ्ठल पंडित
हिंगोलीवरून गुटख्याचा भरलेला ट्रक आखाडा बाळापुर मार्गे नांदेडकडे जात असल्याची गुप्त माहिती बाळापुर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे चिंचोलकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून संशयित ट्रक पकडला असता, त्या ट्रकमध्ये गुटख्याचे २३४ पोते अंदाजे १ पोते ७० हजार रूपये किमंतीचे असा १ कोटी ६३ लाख रूपयांचा गुटखा तर ३० लाख रूपयांचा ट्रक असा एकूण १ कोटी ९३ लाख ८ हजार रूपयांचा मुद्देमाल बाळापुर पोलिसांनी जप्त करून आज शनिवार (दि.१३) दुपारी २ वाजताच्या सुमारास गुटखा माफीयांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नांदेड येथील एका खबऱ्याकडून दिल्लीवरून गुटखा भरून निघालेला ट्रक बाळापुर- नांदेड मार्गे लातुरकडे जात आहे अशी गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना मिळाली त्यानंतर चिंचोलकर यांनी पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी संदिप चव्हाण, पोलीस नायक शेख बाबर, राजू जमदाडे यांच्या मदतीने वारंगा फाट्यावर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एक संशयित ट्रक आरजी ११ जीए ९८४५ हा पकडला असता, या ट्रकमध्ये प्रथमदर्शनी गुटख्याच्या पोत्याभोवती कुलूप, फॅन, दुचाकी, चारचाकी, वाहनाचे सुटेभाग, जीन्स पॅन्ट, टी-शर्ट आदी सामानाची पॅकिंग आढळले. अधिक चौकशी केली असता, या ट्रकमध्ये २३४ पोते गुटखा एका पोत्याचे वजन ५० ते ५२ किलो असून एका पोत्याची किमंत अंदाजे ७० हजार रूपये असा १ कोटी ६३ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तर गुटख्यासाठी ने-आण करणारा ट्रक ३० लाख असा एकूण १ कोटी ९३ लाख ८ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

हा ट्रक वारंगा फाटावरून बाळापुर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हमालाच्या मदतीने हे सर्व पोते काढण्यात आले. त्यानंतर ट्रकचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, शेख बाबर, संदिप चव्हाण, राजू जमदाडे, गोले, शंकर मुलगीर आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे हा गुटखा मिसळ केलेला असून लातुर येथे केवळ पॉकिंग करण्यासाठी जात होता. लातुर येथील एका मोठ्या गुटखा बहादराचा हा माल असून याबाबत बाळापुर पोलीस अधिक तपास करत आहेत. पकडण्यात आलेल्या ट्रकचा ड्रायव्हर जितेंद्र रमेश गौड (वय २२) रा.वसई डांग, ता.बारी, जि.धौलपुर, राजस्थान व क्लिनर लोकेंद्र पातीराम भारती (वय २१) रा.लिल्लर कोल्हुआ राजस्थान यांना अटक करण्यात आले आहे. दरम्यान वसमतचे पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद यांनी बाळापुर येथे भेटी देवून संबंधीत प्रकरणाची माहिती घेतली याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


बाळापुर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक.
गेल्या कित्येक दिवसापासून अवैधधंद्याने मलीन झालेल्या आखाडा बाळापुर पोलिसांची प्रतिमा आहे़ पण गेल्या काही दिवसापासून बाळापूर पोलिसांनी धडक कार्यवाही सुरू केली आहे. यापुर्वी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी आडत दुकानात राशनचा गव्हू जप्त केला होता. ते ही मोठी कार्यवाही होती. तसेच गावठी दारू अड्यावर धाडी टाकून हे आड्डे त्यांनी ध्वस्त केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही गुटख्याची मोठी कार्यवाही मानली जात आहे. त्यामुळे बाळापुर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment