भारत-उझबेकिस्तान यांच्यात १७ करार

Monday, October 1, 2018

नवी दिल्ली : भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात सोमवारी १७ द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. राजनयिक पासपोर्टधारकांना व्हिसामुक्त प्रवेश, पर्यटन, राष्ट्रीय सुरक्षा, उच्चायुक्तांना प्रशिक्षण देणे व तस्करी रोखण्यास उभय देशांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उजबेकिस्तानचे राष्ट्रपती शावकत मिर्जियोयेव यांच्यात नवी दिल्ली येथे शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली. विविध क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्य करण्यास यावेळी दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली. 

भारत व उजबेकिस्तान यांच्यात सैन्य शिक्षण, कृषी क्षेत्रात आघाडी करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य व चिकित्सा विज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्याचे करार झाले आहेत. याशिवाय औषध निर्माण क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या सहमती पत्रावर दोन्ही देशांच्या नेत्यांनी मोहोर उमटविली आहे. मादक पदार्थांची तस्करी रोखणे व त्याचा कणखरपणे सामना करण्यावरही मतैक्य झाले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, भारत व उजबेकिस्तान आगामी काळात शांततापूर्ण उद्दिष्टे गाठण्यासाठी बाह्य अंतराळात संशोधनात परस्परांना सहकार्य करणार आहेत. याचवेळी व्यापारिक परिषदेच्या माध्यमातून आर्थिक संबंध बळकट करण्यावर दोन्ही देश भर देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे..

No comments:

Post a Comment