कळमनुरी / गजानन कापसे
गेल्या साडेचार वर्षापासून महाराष्ट्रातील जनता वनवास भोगत आहे. दुष्काळ, बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वस्तरावर ेहे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे येत्या काळात या सरकारला खाली खेचा केवळ आश्वासनांची खैरात करून जनतेची दिशाभुल करणारे हे थापाडे सरकार फडणवीसांचे नसून फसणवीसांचे आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी कळमनुरी येथे संघर्षयात्रेत बोलताना केला.
महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सभा 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता कळमुनरी येथे पार पडली. या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री रजनीताई सातव, खा. ऍड. राजीव सातव, आ.डी.पी.सावंत, आ.अमर राजुरकर, माजी खा.तुकाराम रेंगे, आ.डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, युवा नेते बालाजी गाडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा.अशोक चव्हाण म्हणाले की, या संघर्ष यात्रेतून सत्ता मिळवणे हा हेतू नसून या सरकारचे वाभाडे काढून जनसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. गेल्या साडेचार वर्षात भरमसाठ आश्वासने देवून आज कोणतेही आश्वासने पुर्ण केली नाही. फक्त निवडुन येण्यासाठी आम्ही आश्वासने दिले होते, अशी कबुलीही ना. नितीन गडकरी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
चार वर्षापुर्वी कु ठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी विचारणा कॉंग्रेसला करणाऱ्या भाजपा सरकारने आता महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हेही सांगणे गरजेचे असल्याचे चव्हाण म्हणाले. या थापाड्या सरकारला जनता कंटाळली असून उद्या मतदार घ्या, यांना बदलल्याशिवाय राहणार नाही. नोकरीचे आमिष दाखविले, अनेक आश्वासने दिले पण पुर्ण केले नाही. भाजपा-शिवसेना भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून महाराष्ट्र खाऊ असा धंदा यांनी चालविला आहे. हे जलयुक्त नाही तर झोलयुक्त सरकार आहे, अशी उपरोक्त टिकाही त्यांनी केली. जाहीरातबाज सरकार कोणाचेही फोटो घेऊन पेपरमध्ये छापतात पण प्रत्यक्षात त्याला लाभ मिळालेला नसतो. खड्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आता खड्यांचे नामकरण करायचे असून लहान खड्याला चंद्रकांत पाटील मोठ्या खड्याला देवेंद्र फडणवीस व त्यापेक्षा मोठ्या खड्याला नरेंद्र मोदी असे नाव द्यायचे आहे, अशी परिस्थिती राज्यात आणि देशात झाली आहे.
सीबीआयच्या प्रमुखाला रजेवर पाठविले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेवून लोकशाही धोक्यात असल्याचे स्पष्ट करतात, असे एक ना अनेक कारनामे भाजपा सरकारच्या काळात झाले आहेत. ईव्हीएम मशिनमध्ये घाळघोळ करून पंजाचे मतदान कमळाला दिले जाते, असा आरोपही खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. या सभेला महिला जिल्हाध्यक्ष शोभा मोगले, कळमनुरी तालुका अध्यक्ष धनंजय पाटील, हिंगोली तालुका अध्यक्ष आनंदराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य सतिष पाचपुते, मजुर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, कॉंग्रेस प्रवक्त विलास गोरे, सुधीरआप्पा सराफ , डॉ. रवि पाटील, बापुराव घोंगडे, जि.प.सदस्य कैलास साळुंके आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत ही संघर्ष यात्रा संपन्न झाली. यावेळी काही भाजपा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
खासदार राजीव सातव माझा लहान भाऊ
खासदार राजीव सातव हा माझा लहान भाऊ आहे. त्यासाठी आपण सर्वांनी भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. मी हिंगोली मतदार संघातील सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरे तर त्यांनी मोदी लाटेत खासदार सातवांना निवडुन दिले. निवडणुक काळात निकाल पाहत असताना मला असे वाटत होते, मला कोणी संसदेत सोबत आहे की, नाही पण दुपारनंतर खासदार सातवांचा विजय झाल्याने मला बरं वाटलं, अशी आठवणंही खा.अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.
दाढीवाल्या बाबाला माय-माऊलीचा टळटळाट लागेल- खा.सातव
फीस भरायला पैसे नाहीत म्हणून आमची शितल वायाळ नावाची भगिनी आत्महत्या करते तर माझा शेतकरी बाप स्वत: सरण रचून आत्महत्या करतोय, एवढी वाईट परिस्थिती आहे. गेल्या वर्षी दिवाळीला जाहीर केलेली कर्जमाफी यंदाच्या दिवाळीतही पुर्ण झाली नाही. खोट्या आश्वासनामुळे महाराष्ट्रात सर्वांत जास्त आत्महत्या होत आहेत. जलयुक्त शिवाराचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी भाजपा मंत्र्यांच्या घरात मुरले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपुर्वी दाखविलेली छपन्न इंचाची छाती पाकिस्तानात जावून राष्ट्रअध्यक्षाच्या वाढदिवसाचा केक कापून आली. उद्या खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असा पण करा की, शेतकऱ्यांना, गोरगरीबांना लुबाडणाऱ्या सरकारला आता घरी पाठवा. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. हिंगोली जिल्ह्यात तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करून औंढा आणि वसमत कोणत्या निकषावर सरकारने वगळले आहे, असा सवालही खा. सातव यांनी उपस्थित केला. शिवसेनेविषयी बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना आता संपली असून राजीनामे खिशात ठेवणाऱ्यांची शिवसेना आता आली आहे. आता ढाण्या वाघही डरकाळी फोडत नाही, अशी टिकाही खा. सातवांनी शिवसेनेवर केली. गोरगरीब जनतेला आश्वासनांची खैरात देवून हे देशातील जनतेला देशाधडीला लावणाऱ्या नोटबंदीच्या काळात अनेकांना बेरोजगार व्हावे लागले, अनेक माय-माऊल्यांनी पै-पै करून जमा केलेले पैसे बाहेर काढावे लागले. अशा कारणांमुळे नरेंद्र मोदींचे नाव न घेता या दाढीवाल्या बाबाला माय-माऊल्यांचा टळटळाट लागेल, असेही खा. राजीव सातव म्हणाले.
बाळासाहेब थोरातांकडून खा.सातवांचं मुक्त कंठाने कौतुक
खा. राजीव सातव कृषि सभापती असताना मी मंत्री होतो. मी हिंगोलीत आलेलो असताना मला त्यावेळी वाटले नव्हते की, जिल्हा परिषदेचा सभापती आज दिल्लीचे नेतृत्व करेल. खासदार सातव हे देशातील युवक नेते असून हिंगोलीकरांना याचा अभिमान वाटायला पाहिजे. कर्तव्यदक्ष आमदार संतोष टारफे आणि संसदरत्न खासदार तुम्हाला मिळालेले असताना तुम्हाला काहीही चिंता करायची नाही, महाराष्ट्रात आणि केंद्रात दिल्लीचे सरकार आणा मग पहा गडी कसा पुढे सरकतो, अशा पद्धतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खा. राजीव सातव यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.
थापाड्या सरकारला घरी बसवा-आ.टारफे
संघर्ष यात्रेच्या प्रास्ताविक भाषणात बोलताना आ. डॉ. संतोष टारफे म्हणाले की, या सरकारने खोटे आश्वासन सर्वसामान्याच्या माथी मारले आहेत. लोक आज जागृत झाले आहेत. पेट्रोल, दरवाढ, फसवी कर्जमाफी यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली असून पालकमंत्र्यांनी वाटप केलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्रही परत वापस घ्यावे लागले, हे भाजप सरकारचे अपयश आहे, त्यामुळे या थापाड्या सरकारला घरी बसवा, असे आवाहन डॉ. संतोष टारफे यांनी केले.
अजान सुरू होताच सभा स्तब्ध
संघर्ष यात्रेदरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी मुस्लिम बांधवांची अजान सुरू झाली आणि हा आवाज पाटील यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी आपले भाषण थांबविले. सर्वप्रथम सभेलाही कारण समजले नाही. पण ही बाब सर्वांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी शांतता पाळत या अजानमध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर पुन्हा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, या अपशगुनी सरकारने 122 आमदारांच्या जोरावर अमावस्येला शपथ घेतली आणि राज्यात दुष्काळ पडला. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची पुजा करू नये ही खुद्द पंढरीच्या विठ्ठलाचीच इच्छा होती. त्यामुळे या महापुजेचा मान मुख्यमंत्र्यांना मिळाला नाही.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


No comments:
Post a Comment