हिंगोली / प्रतिनिधी
औंढा नागनाथ तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे गोरखनाथ यांच्या दर्शनासाठी पोळा सणाच्या दुसरे दिवशी हिंगोली, नांदेड, वसमतसह परिसरातील शेतकरी बैलांच्या जोड्या घेऊन दर्शनासाठी दाखल झाले. यावेळी या रस्त्याची वाहतुक वळवण्यात आली होती.
वाई गोरखनाथ येथील श्री गोरखनाथांचे दर्शन घेऊन तेथील अंगारा बैलाना लावल्यानंतर खुरी, वात मांसारखे रोगापासून बैलांचे संरक्षण होते अशी धारणा आहे. अनेक वर्षापासून शेकडो बैलजोड्या पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी वाई गोरखनाथाला येेतात. 10 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच श्री गोरखनाथांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या बैलजोड्या घेऊन वाई गोरखनाथांच्या दिशेने निघाले होते.
यावेळी रस्त्यावर ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. गोरखनाथ मंदिराच्या परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी त्यांचे बैल घेऊन दर्शन घेताना आणि अंगारा लावताना पहावयास मिळाले. यावेळी मंदिर परिसरात बैलजोड्यांना उभे टाकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी परिसरातील लोकही मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या.तसेच या पार्श्वभुमीवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

No comments:
Post a Comment