शेतकऱ्यांबरोबरच महिलांनीही जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे वळले पाहिजे : पालकमंत्री- पंकजा मुंडे

Sunday, September 30, 2018

बीड, दि.30:-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पशुधन हे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत असून शेतकऱ्यांबरोबरच महिलांनीही जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे वळले पाहिजे, या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले. 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून प्रथमच संगणकीय राज्यस्तरीय 20 वी पशुगणना कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी येथे संपन्न झाला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

या कार्यक्रमास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, आमदार आर टी देशमुख, आमदार भीमराव धोंडे, आमदार लक्ष्मण पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, पशुसंवर्धन अतिरिक्त उपायुक्त डॉ. एम.डी चव्हाण, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सुनील राऊतमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी व महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल होत असल्याने नागरिक, शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन सारख्या व्यवसायाकडे वळले पाहिजे. महिला आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही यासाठी महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी महिलांनी शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय करावे. यासाठी महिला व बालविकास विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

डोंगराळ भागातील आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा खूप मोठा हातभार लागतो आहे. शेतकऱ्यांना नगद उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. शासन यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून अनुदानही उपलब्ध करुन देत आहे. शेतकरी व महिलांनी याचा लाभ घेण्याची गरज आहे. राज्यात संगणकीय पध्दतीने प्रथमच पशुगणना होत असून या पशुगणनेच्या मोहिमेमध्ये पशुपालकांनी आपला सहभाग नोंदवावा आणि आपल्याकडे असलेल्या सर्व पाळीव प्राण्यांची सविस्तर माहिती येणाऱ्या प्रगणकाला दयावी. या कामांमध्ये पशुपालकाने सहकार्य करावे. असे आवाहनही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले. 

यावेळी बोलताना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर म्हणाले की, संपुर्ण देशात प्रथमच संगणकीय पध्दतीने पशुगणना होत असून याची सुरुवात परळी येथून होत आहे. सर्व पशुपालकांनी पशुगणना करून घ्यावी. आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकाला पाळीव प्राण्याची संपूर्ण माहिती दयावी. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यात चांगले कामे झाले असल्यांने या विभागाची नोंद देशपातळीवर झाली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. या विभागाच्या माध्यमातून सर्व सामान्य गरजु लाभार्थ्यांना योजनांचा जास्तीत- जास्त लाभ मिळाला पाहिजे यासाठी पशुगणना होणे आवश्यक आहे. त्यामुळे पशुपालकांनी गणना करून घेणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पशुपालक योजना लवकरच सुरु करण्यात येणार असून याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात प्रथमच संगणकीय राज्यस्तरीय 20 वी पशुगणना होत असून ही पशुगणना यशस्वी करण्यासाठी पशुपालकाने येणाऱ्या प्रगणकाला माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

यावेळी पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी आपल्या प्रास्ताविकात पशुगणना ही आधारभूत माहितीचा मुख्य स्रोत आहे. शासन पशुसंवर्धन क्षेत्रात निरनिराळया सुधारणा व विकास घडवून या क्षेत्राला उद्योग क्षेत्र विकसीत करत आहे. त्यासाठी पशुगणना हीच आधारभुत माहिती आहे. पशुगणनेच्या आधारावर जनावरांमध्ये अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम, रोग नियंत्रण कार्यक्रम, पशुपैदास धोरण व नैसर्गिक आपत्तीच्या काळात चारा टंचाई /पाणीटंचाई व झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पशुगणना महत्त्वाची आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गौ मातेची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत राज्यातील पहिली किल्ले धारूर शेळी पालक उत्पादक कंपनी या कंपनीचे उदघाटन संपन्न झाले तसेच यावेळी उत्कृष्ट कामाबद्दल जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमास पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नागनाथ पानढवळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संतोष पालवे. डॉ. रवी सूरेवाड, डॉ. अनिल भिकाने, डॉ. शैलेश मदने, श्री मुरकुटे, डॉ. विजय कराड, डॉ प्रकाश आघाव, डॉ. रश्मी ठाकूर, डॉ. सुदर्शन मुंढे, डॉ. अनिल केंद्रे, डॉ. फड, डॉ. पाथरकर, डॉ. विठ्ठल मुंडे, डॉ. सचिन सानप, डॉ. अमोल मोहोळकर, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment