जिल्हाभरात गणरायाचे उत्साहात आगमन चिंतामणी गणपतीची शहरात मिरवणुक

Friday, September 14, 2018

छाया-चंद्रकांत वैद्य 
हिंगोली / प्रतिनिधी 
लहान-मोठ्यासह आतुरता असते ती, गणेश चतुर्थीची गेल्या महिनाभरापासून जिल्हाभरात अनेक मंडळांनी गणरायाच्या स्थापनेसाठी जय्यत तयारी केली होती. 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी हिंगोली शहरात सकाळपासूनच अनेक मंडळांनी ढोल-ताशाच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले. व त्यानंतर सायंकाळी गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजार गजबजला होता. तसेच जागरूक देवस्थान म्हणून चिंतामणी गणपतीचीही शहरात वारकरी परंपरेनुसार थाटात मिरवणुक काढण्यात आली. तसेच गुजरात प्रभारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.ऍड. राजीव सातव यांनी त्यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना केली. 

13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र बाजारपेठा फुलल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. नवलाला पावणारा गणपती म्हणून येथील चिंतामणी गणपतीची ख्याती आहे. संस्थानच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहापासून चिंतामणी गणपतीच्या पालखीची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत थोटे-मोठे वारकरी टाळमृदंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया या जयघोषात मार्गक्रमण करत होते. येथील गांधी चौकात या वारकरी मंडळींनी चाली, फुगड्या खेळल्या. या मिरवणुकीत घोड्यांचाही सहभाग होता. अतिशय शांततेत व उत्साहात ही मिरवणुक पार पडली. हिंगोली येथील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखा पेक्षा अधिक भाविक दुरवरून येतात. या भक्तांना देवस्थानकडून दर्शनासाठी देखील व्यवस्था केली जाते. मोदकाचा प्रसाद हा चिंतामणी गणपतीच्या भक्तांसाठी महत्वपूर्ण मानला जातो. 

लाखो मोदक येथे भक्तांना वाटप केले जातात. आपली मनोकामना व नवस पूर्ण करण्यासाठी भक्त देखील मनोभावे चिंतामणीला मोदक वाहतात. येथे येणारा गणपती भक्त मोठ्या श्रध्देने दाखल होतो. घडेल तेवढी देणगी देखील देण्याचे काम भक्तांकडून होते. यावेळी मात्र भक्तांच्या या देणगीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. भक्तांच्या देणगीसाठी गणपती मंदिरात मदत पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. ही संकल्पना हिंगोली येथील धर्मदाय आयुक्त आर.बी.घायतडक यांची असून देणगीतून गुणवंत विद्यार्थी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या गरजू, गरिब विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. 13 सप्टेंबर रोजी श्री गणेशाची प्रतिस्थापना होणार आहे. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थी पर्यंत भक्तांची मोठी गर्दी येथे राहणार आहे. त्यामुळे एक दिवस अगोदर 12 सप्टेंबर रोजी चिंतामणी गणपती मंदिरात दुपारी धर्मदाय आयुक्त आर.बी.घायतडक यांच्या संकल्पनेतून मदतीची ही पेटी ठेवून सील करण्यात आली आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालय अधीक्षक आर.एन.गिरे व निरीक्षक एस.एस.लहाने, मंदिर संस्थानचे सचिव दिलीप बांगर, अध्यक्ष मिस्कीन तसेच मंत्री व भक्तजण आदींनी ही मदत पेटी येथे ठेवली आहे. या स्तुत्य उपक्रमाचा नक्कीच गरजूंना फायदा होणार आहे हे निश्चित. 

गणेश उत्सवात दररोजच मानाच्या मोदकाचे वाटप करण्याचे निर्देश 
चिंतामणी गणपती मंदिरात अनंत चतुर्थीच्या दिवशी भक्तांची दर्शनासाठी येणारी संख्या लाखोंच्या घरात असते. एकाच दिवशी दर्शनासाठी होणारी ही गर्दी पाहता यावेळी धर्मदाय आयुक्ताने एक वेगळे निर्देश संस्थान सदस्यांना दिले आहेत. गणेशोत्सव काळात सर्व दिवस मोदकाचा स्वीकार व वाटप व्हावे, असेही निर्देश असल्याची माहिती देखील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

यातून भक्तांची होणारी गैरसोय कमी तर होईलच पण बाहेरहून येणाऱ्या भक्तांना देखील होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होईल,अशी अपेक्षा आहे. पण, तब्बल दहा दिवस चिंतामणी मंदिर परिसरात रस्त्यावरच दर्शनासाठी कठडे लावल्यामुळे कदाचित अडचण होवू शकते असा ही एक विचार पुढे येवू लागला आहे. एकूणच धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून चिंतामणी मंदिराच्याबाबतीत घेतले जाणारे निर्णय महत्वपूर्ण मानले जावू लागले आहेत.

No comments:

Post a Comment