वॉशिंग्टन : अणु पुरवठादार समूह अर्थात एनएसजी सदस्यत्वासाठीच्या पात्रतेचे सर्व निकष भारत पूर्ण करीत असून, या समूहातील भारताच्या समावेशाचे अमेरिकेकडून सातत्याने समर्थन केले जाईल, असे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. चीनच्या व्हिटोमुळे भारताला एनएसजी सदस्यत्व मिळाले नाही.
भारत एनएसजी सदस्यत्वासाठीच्या सर्व पात्रता पूर्ण करतो, असे आम्हाला वाटते. भारताच्या सदस्यत्वाचे आम्ही जोरदारपणे समर्थन करीत राहू, असे अमेरिकेचे दक्षिण व मध्य आशियासाठीचे उप परराष्ट्रमंत्री एलिस वेल्स म्हणाल्या. जागतिक अणु व्यापाराचे नियंत्रण असलेल्या ४८ सदस्यीय अणु पुरवठादार समूहाचे सदस्यत्व भारताला हवे आहे. मात्र चीनकडून यात सातत्याने अडथळे निर्माण केले जात आहेत. या समूहातील बहुतांश पाश्चात्त्य राष्ट्रांनी भारताच्या सदस्यत्वाला समर्थन दिले आहे. मात्र भारताने अण्वस्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसल्याचे कारण देत चीन याला विरोध करीत आहे.
चीनच्या व्हिटोमुळे भारताला दिले जाणारे समर्थन आम्ही मागे घेणार नाही. आम्ही एसटीए दर्जासह पुढे वाटचाल करीत आहोत.एसटीए-१ दर्जा देऊन अमेरिकेने भारताला सर्वात निकटच्या सहकाऱ्यांच्या यादीत टाकले आहे, असेही ते म्हणाले. एनएसजीतील सर्व सदस्यांची सहमती मिळाल्यानंतरच या समूहात एखाद्या नव्या राष्ट्राचा समावेश केला जातो. व्हिटो अधिकाराचा वापर करून चीन भारताच्या सदस्यत्वाला विरोध करीत आहे. याशिवाय पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानाच्या मुद्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. भारतासोबतचे संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी ही समस्या सोडविणे गरजेचे असल्याचेही वेल्स म्हणाल्या. दहशतवाद नियंत्रणावरील चर्चा ही कायमच भारत-अमेरिकेच्या संबंधांतील महत्त्वाची बाब राहिल्याचेही त्या म्हणाल्या.

No comments:
Post a Comment