लातूर,दि.:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथे पहिल्या टप्प्यातील दिनांक 7 ऑक्टोंबर 2018 रोजी अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तर लातूर जिल्हयातील प्रत्येक गोर-गरीब व गरजू रूग्णांना या शिबीरातील आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याची जबादारी सर्व राजकीय पक्ष,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी सर्वांनी या महाआरोग्य शिबीरात आपले योगदान देण्याचे आवाहन कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अटल महाआरोग्य शिबीराबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी माजी खा.गोपाळराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषद उप आध्यक्ष रामचंद्र तिरूके, उपमहापौर देविदास काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ् निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,आरोग्य उपसंचालक हेमंत बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक संजय ढगे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ परगे, डॉ श्रीधर पाठक यांच्या सह इतर राजकीय पक्षांचे प्रमुख पदधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, हे महाआरोग्य शिबीर हे लातूर जिल्हयातील सर्वसामान्य गरजू रूग्णांना सर्व रोग निदान व उपचार एकाच ठिकाणी व मोफत उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. या संधीचा लाभ सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यर्त्यांनी घेऊन आपल्या परिसरातील गरजू रूग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याकरिता या शिबीराला कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ् मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक रूग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. गोर-गरीब रूग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार घेणे शक्य नसते. अशा सर्व रूग्णांना या शिबीरात विनामूल्य सर्व प्रकारचे उपचार व जगप्रसिद्ध नामवंत व तज्ञ डॉक्टर्सकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य कायर्कर्ता म्हणून आपल्या परिसरातील एक ही गरजू रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे श्री.निलंगेकर यांनी सांगितले.
समाजातील शेवटच्या माणासापर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी हे शिबीर अत्यंत महत्त्वाचे असून शिवछत्रपती शैक्षणिक संस्था लायन्स क्लबचा या शिबीरात सक्रीय सहभाग असेल असे माजी खासदार पाटील यांनी सांगितले. तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ.भऱ्हाटे यांनी शिबीराला सर्व प्रकारचे सहकार्य असोसिएशन करेल असे स्पष्ट केले.
लोकसहभागातून शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी महाआरोग्य शिबीर महत्त्वाचे असून यामुळे जे रूग्ण अद्यावत रूग्णालयातील आरोग्य सेवा घेऊ शकत नाहीत त्यांना त्या सेवा त्यांच्याच भागात देण्यासाठी हे शिबीर आहे,अशी माहिती आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांनी दिली. या कामांत प्रशासनाबरोबर राजकीय पक्ष,पदधिकारी व लोकप्रतीनिधी यांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.
लातूर येथे दिनांक 7 ऑक्टोंबर 2018 रोजी लातूर,औसा,रेणापूर,निलंगा व चाकूर या पाच तालुक्यासाठी पहिल्या टप्यातील अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराच्या यशस्वीतेसाठी या पाच तालुक्यातील एक ही रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही याकरिता प्रशासनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविकात दिली. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे जिल्हा शल्य चिकित्सक संजय ढगे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment