महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक , उत्तर प्रदेशमधील भाविकांची उपस्थिती
हिंगोली / ज्ञानेश्वर लोंढे
नवसाला पावणारा गणतपती म्हणून महाराष्ट्रासह इतर शेजारील राज्यातही हिंगोली येथील चिंतामणी गणपतीची ख्याती पसरली आहे. आज रविवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्रीपासूनच हजारो भाविकांनी विघ्णहर्त्याच्या दर्शनासाठी रिघ लावली आहे.
शहरातील गड्डेपिर गल्ली भागात असलेल्या चिंतामणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक व उत्तर प्रदेशातील भाविकांनी रिघ लावली आहे. भक्तांच्या मांदियाळीने हिंगोलीचे प्रतीपंढरपूर झाले आहे. सकाळी 6 वाजता चिंतामणी देवस्थानच्या वतीने कयाधू नदीपर्यंत कावड यात्रा काढण्यात आली. कयाधूचे जल घेऊन ही कावड यात्रा देवस्थानपर्यंत पोहोचली. त्यानंतर सामुदायिक गणपती अथर्वशिष पठण करण्यात आले. संस्थानच्या वतीने महापुजा झाली. व त्यानंतर नवसाच्या मोदकांचे वाटप सुरू झाले, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष दिलीप बांगर यांनी दिली आहे.
चिंतामणीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने हिंगोली सामाजिक संस्था, व्यापारी व गणेश भक्तांच्या वतीने बसस्थानक, रेल्वे स्थानक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, आंबेडकर चौक, महेश चौक आदी ठिकाणी चहा, फराळ व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
चलो चिंतामणी, चलो चिंतामणी
चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी स्थानिक ऍटोचालकांनी बसस्थानक ते चिंतामणी गणपती मंदिर तसेच रेल्वे स्थानक ते चिंतामणी गणपती मंदिर अशी विनामुल्य व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऍटोचालकांनी ऍटोवरही मोफत प्रवासाचे पोष्टरही चिपकवले आहेत. बसस्थानक व रेल्वेस्थानकावर ऍटोचालक उभे राहून स्वत: चलो चिंतामणी, चलो चिंतामणी अशी साज भाविकांना घालत आहेत.
सिसिटीव्हीच्या देखरेखील भाविकांची सुरक्षा
गर्दीच्या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या वतीने खबरदारी घेण्यात आली आहे. चिंतामणीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याने ठिकठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. श्री विघ्णहर्ता चिंतामणी गणपती मार्गासह महावीर चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक यासह इतर ठिकाणी जवळपास 64 सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सिसिटीव्हीच्या माध्यमातून मंदिर संस्थानचे पदाधिकारी व पोलीसांना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे.
भाविकांच्या सेवेसाठी 1200 स्वयंसेवक
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. तसेच संस्थानच्या वतीने पुर्वनियोजित सेवेकऱ्यांना ओळखपत्रे देवून भाविकांच्या सेवेसाठी हे स्वयंसेवक काम करीत आहेत.
आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय पथक
आज झालेली लाखो भाविकांची गर्दी पाहता जिल्हा सामान्य रूग्णालयातर्फे दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. अमोल दरगु, डॉ. सुचिता इंगोले, डॉ. कैलास पवार, डॉ. आश्विनी नवघरे, डॉ.ए.एस.धबडगे, डॉ. सारिका डुकरे, डॉ. एम.के.भोसले, डॉ. इंदू पेरके आदींचा समावेश आहे.
वाहतुक व्यवस्थासाठी पोलीसांकडून चोख बंदोबस्त
भाविकांची वाढती रिघ पाहता पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून गणपती चौक, महात्मा गांधी चौक, महावीर स्तंभ आदी ठिकाणी वाहतुक मार्गात बदल करून वाहनास बंदी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी वाहतुक शाखेच्या वतीने बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत.
पार्किंग व्यवस्था फुल
चिंतामणी देवस्थानच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी येथील रामलिला मैदान, एनटीसी परिसरातील दोन मैदान व लाला लजपतराय नगरातील खुल्या मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहेत. सकाळपासूनच भाविकांची संख्या वाढल्याने चारचाकी वाहनाने ही पार्किंग व्यवस्था फुल झाल्याचे समजते.
दुपारपर्यंत दिड लाखावर भाविकांचे दर्शन
रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत दीड लाख भाविकांनी चिंतामणीचे दर्शन घेतल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत हा आकडा मोठा होणार आहे.
राजकीय मंडळी बाप्पांच्या दर्शनाला
चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला खा. राजीव सातव यांनी सपत्नीक उपस्थित राहून पुजा अर्चा केली. आ. रामराव वडकु ते यांनी दर्शन घेतले. आ.डॉ. संतोष टारफे, माजी आ. गजाननराव घुगे, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी राजकीय मंडळींनी गणरायाचे दर्शन घेऊन हे गणराया पाऊस पडू दे, शेतकऱ्यावरील विघ्ण दुर कर अशी प्रार्थना केली. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, युवा नेते राम कदम हे आज सकाळपासूनच भाविकांना फराळ वाटप करत आहेत.
हिंगोलीत भक्तीमय वातावरण
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया असा जयघोष करत हजारो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी रांगेला लागले आहेत. अनेक महिला भक्तगण आपल्या वाणीतून गणरायांचे गीत गावून गणरायाची आराधना करीत आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे हिंगोली शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment