श्री गणेशाचे बालपण

Saturday, September 8, 2018
एकदा सर्व ऋषीपुत्र गणेशाबरोबर खेळ खेळण्यात दंग झाले होते. सायंकाळ केव्हा झाली हे त्यांना कळलेच नाही. इकडे ऋषीपुत्रांचे आई वडील त्यांच्या शोधार्थ निघाले. गणेश काही क्षणापुरता अदृश्य होऊन पुनः मुलांना हाका मारू लागला. तोच सर्व मुले त्याच्याजवळ आली व म्हणाली, गणेशा आम्हाला खूप भूक लागली आहे. त्यावर गणेश म्हणाला, तुम्ही काहीही चिंता करू नका मी त्याची व्यवस्था केलेली आहे. मग सारी मुले घेऊन गणेश गौतम ऋषींच्;या आश्रमात शिरला. भाताची पातेली चोरली. मुलांनी पोटभर भात खाल्ला. हे वृत्त गौतमऋषी पत्नी अहिल्येला समजले व तिने पार्वतीला सांगितले.

पार्वतीला गणेशाचा राग आला व तिने त्याला खांबाला बांधून शिक्षा केली. सर्व मुले अंगणात खेळत होती. तेव्हा गणेशही त्यांच्याबरोबर खेळत आहे असे दृश्य पार्वतीला दिसले ते सरळ त्याच्या समीप गेली तेव्हा गणेशाने सांगितले मी तुझा गणेश नाही. पार्वती बुचकळ्यात पडली व घरात येऊन पाहते तर तो गणेश तर खांबाला बांधलेलाच होता. त्यावेळी पार्वतीचा राग मावळला व तिने गणेशाला हृदयाशी धरून कुरवाळले.

नंतर ऋषींनी गणेशाला गायत्री मंत्र दिला. आदिती व कश्यपही तिथे उपस्थित होते. ब्रह्मदेवाने व इतर देवांनी गणेशाला भिक्षादान केले. कश्यप व आदितीने केलेल्या बटूंची त्यांना आठवण झाली. तेव्हा गणेशाने त्यांना पूर्व रूपात दर्शन दिले. त्यासमयी आदितीला माया फुटली. आदिती म्हणाली, सुकुमारा तू आमच्यापासून दूर राहू नको. तेव्हा गणेश उद्गारला मी दूर नसून तुमच्या अंतर्यामी आहे. मी सदैव तुमच्याच सान्निध्यात असेन. नंतर गणेशाची मुंज यथासांग पार पडली. याप्रसंगी गणेशाच्या सवंगड्यांनी आपण वेद पठण करूया अशी आशा व्यक्त केली आणि गणेशाने प्रत्येकाच्या शिरी हात ठेवला तो काय नवल. ती सर्व मुले न चुकता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद इ. वेद म्हणाली. ते ऐकून ऋषीगणांना अचंबा वाटला.

No comments:

Post a Comment