एकदा पार्वती शंकराला म्हणाली, नाथ आपण सर्व देवामध्ये अग्रगण्य आहात म्हणून तुम्हाला महोदव म्हणतात. इतर देव दैत्य कुणा ना कुणाची भक्ती करतात. तेव्हा तुम्ही कोणावर श्रद्धा ठेवता? तेव्हा शंकर म्हणाले, जो सत्व, रज व तमाला आपल्या नियंत्रणात ठेवतो तोच गुणेश होय व तोच गणाचा प्रमुख असून त्यालाच गणेश म्हणतात. त्याला परमात्मा असेही म्हणतात. पार्वती म्हणाली त्या गणेशाबद्दल मला आकलन कसे होईल. यावर शंकरानी पार्वतीला एकाक्षरी मंत्र दिला व १२ वर्ष तप करण्यास सांगितले. १२ वर्ष तप पूर्ण झाल्यावर गणेश पार्वतीला प्रसन्न झाले. पार्वती त्यास म्हणाली तू माझा पुत्र म्हणून या जगात प्रख्यात व्हावे. श्री गणेश प्रस्नन झाले, वर दिला व गुप्त झाले.
एका भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वतीने मातीची मूर्ती बनवली. त्या मूर्तीची पूजा केली. तोच त्या मुर्तीला सजीपणा आला व ती मूर्ती म्हणाली पार्वती मीच गणांचा प्रमुख सर्वगुण संपन्न गुणेश होय. तू ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतीस तोच मी गणेश अवतार घेऊन आलो आहे. मूर्तीतून उमटलेले चित्र सचिव झाले व पार्वतीला पान्हा फुटला व पार्वतीने बाल गणेशाला आपल्या जवळ घेतले.
त्या बालकाची जन्म कुंडली पाहिली. भाद्रपद शुद्ध चुतर्थी, सोमवार, स्वाती नक्षत्र सिंहलग्न असा समय होता. पंंचग्रह शुभकार होते. त्या बालकाचे अकराव्या दिवशी गणेश हे नाव जाहीर केले. त्या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी श्री गणेशाचा, जन्मदिन म्हणून मानला जातो. तेव्हापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणेशाची शाडूची मूर्ती आणून किंवा बनवून तिचे पूजन केले जाते व एकूण १० दिवस हे बप्पा आपल्या घरी राहतात व अनंत चतुदर्शी दिवशी पाण्यामध्ये बाप्पांचे विसर्जन केले जाते.
या दहा दिवसात सर्वजण मनोभावे गणेशाची पूजा अर्चना करतात. घराघरात गणेश स्थापना होतेच. पण लोक एकत्र यावे, त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी. विविध विषयांवर त्यांची चर्चा व्हावी. आपल्या देशासाठी एकत्र यावे. त्यातून काही समाजोपयोगी, देशोपयोगी कार्य घडावे या उदात्त भावनेने प्रेरित होऊन लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली व तेव्हापासून सार्वजनिक रुपात गणेशोत्सव साजरे होऊ लागले.
मोठ्या प्रमाणात मंडप उभारून सजावट, रोशनाई, देखावे सादर होतात. पण यात आता स्पर्धा, चढाओढ, राजकारण यांचा समावेश झाला आहे. काही मंडळातून समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम ही राबवले जातात. पण काही मंडळांना व्यवसांनी ही घेरले आहे. हे मात्र टिळकांना कदापि मान्य नव्हते. आज गणेशोत्सव साजरा होतो. पण लोकमान्य टिळकांचा लोकांना विसर पडत चालला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टिळकांचे स्मरण करावे त्यांची प्रतिमा पूजन करावे व त्यांचे विचार अंगीकारावे. त्यांच्यासारखा उदात्त हेतू अंगीकारावा हीच त्यांना श्रद्धांजली होय व तीच गणेशपूजा समर्पित होईल.

No comments:
Post a Comment