पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने लातुरात शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन

Sunday, September 30, 2018

१९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान संपन्न होणार व्याख्यानमाला 

लातूर, दि. २९ : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दि. १९ ते २३ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत लातुरात शारदोत्सवव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला सावेवाडी येथील पूर्णानंद मंगल कार्यालयात दररोज सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे. 

यावर्षीच्या व्याख्यानमालेच्या आयोजनासंदर्भात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाची यावर्षीची कार्यकारिणीही निवडण्यात आली , ती अशी : अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, सचिव अब्दुल गालिब शेख, उपाध्यक्ष सुमुख गोविंदपूरकर, सदस्य : प्रकाश घादगिने, आर.बी. जोशी, संजय अयाचित, संतोष मुगळीकर , आदित्य कुलकर्णी. यावर्षीच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार, दि. १९ ऑक्टो. रोजी यवतमाळचे प्रसिद्ध हास्यकवी मिर्झा बेग ' तुफान विनोदी मिर्झा ऐक्सप्रेस या विषयावर गुंफणार आहेत. 

शनिवार, दि. २० ऑक्टो. रोजी ' महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थिती आणि सरकार समोरील आव्हाने ' या विषयावर टाइम्स ऑफ इंडिया, मुंबईचे राजकीय संपादक प्रफुल्ल मारपकवार मार्गदर्शन करणार आहेत. रविवार, दि. २१ ऑक्टो. रोजी वाघोली आयुर्वेद विद्यालय पुणे च्या उपप्राचार्या वैद्य रेणुका गयाळ ' बदलती जीवनशैली आणि निरोगी जीवन ' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सोमवार, दि. २२ ऑक्टो. रोजी दै. लोकसत्ता , मुंबईचे वरिष्ठ सहाय्यक दिनेश गुणे ' भावी पिढीचे भविष्य ' या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. मंगळवार , दि. २३ ऑक्टो. रोजी दै .सकाळ, नाशिकचे संपादक उत्तम कांबळे ' आजचे भारतीय राजकारण ' या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. 

या शारदोत्सव व्याख्यानमालेचा लाभ लातूर शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन पूर्णानंद सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment