हिंगोली / प्रतिनिधी
मराठा आंदोलकांवरील दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत व वसतीगृहाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा यासाठी 17 सप्टेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेऊन चर्चा केली असता पालकमंत्र्यांनी लवकरच वसतीगृहाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. यापुर्वी14 ऑगस्ट रोजीही पालकमंत्र्यांनी हेच आश्वासन दिले होते. त्यामुळे सध्यातरी मराठा समाजाचे वसतीगृह कागदावरच आहे. समाजाच्या पदरात पडतात त्या केवळ आश्वासनाच्या पोकळ खैरातीच.
ऑगस्ट महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन छेडले होते. येथील गांधी चौकात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर आंदोलकांनी मराठा समाजाच्या जिल्हास्तरावरील मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्र्यांना झेंडा वंदनास मज्जाव केला जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी मध्यस्ती करून मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन व मराठा समाजाच्या मुलांच्या वसतीगृहाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे 14 ऑगस्ट रोजी लेखी पत्राद्वारे आश्वासित केले होते. पण 1 महिना उलटला तरी यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेऊन सदरील बाबींविषयी चर्चा केली असता पालकमंत्र्यांनी ऐन वेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्याशी फोनवरून चर्चा करत लवकरच वसतीगृहाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे जुने शासकीय विश्रामगृह व कार्यालयाची जागा वसतीगृहासाठी दिली जावू शकते, अशी चर्चा झाली. तसेच भाडेतत्वावर एखादी जागा असेल तर तीही तात्काळ आपण मराठा वसतीगृहासाठी उपयोगात आणू शकतो, अशीही चर्चा झाली. पण जिल्हाधिकाऱ्यांन 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रात दहा दिवसात वसतीगृहाच्या जागेबाबत वर्तमानपत्रातून जाहीरात प्रसिद्ध करू व पुढील कार्यवाही करू असे लेखी आश्वासित केले होते. पण कागदपत्राच्या या घोळात अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने वसतीगृहाचा मुद्दा सध्या तरी कागदावरच अडकला आहे. या बैठकीला जिल्हाभरातील मराठा समन्वयक उपस्थित होते.
मराठा वसतीगृहासाठी आ. मुटकुळेंची धडपड
दरम्यान, पालकमंत्र्यांसमवेत सकल मराठा समाजाची चर्चा सुरू असताना आ. मुटकुळेंनी आपल्या संपर्कातील व्यक्तींना फोन करून खाजगी मालकीची जागा मराठा समाजाच्या वसतीगृहासाठी तात्काळ कशी उपलब्ध केली जाईल यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क केले असता पठाडे महाविद्यालयाची जागा उपलब्ध झाली. यााबाबत ही जागा कायदेशीर बाबी पुर्ण करून मराठा समाजाच्या वसतीगृहासाठी उपयोगात आणू यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल, असे आ. मुटकुळे म्हणाले.

No comments:
Post a Comment