बीड, दि.17:- शिक्षक हे समाजसुधारक असून त्यांनी नव्या पिढीला घडविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे बीड जिल्हयातील 11 प्राथमिक, 9 माध्यमिक आणि 1 विशेष शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या समारंभात मार्गदर्शन करतांना पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्याक्षा जयश्री मसके, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, समाज कल्याण सभापती संतोष हंगे, महिला व बालकल्याण सभापती शोभा दरेकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पवार, अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती युध्दजीत पंडीत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, विस्तार अधिकारी तुकाराम पवार,डीसीजी बँकेचे व्यवस्थापक आदित्य सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दिपप्रज्वलन करण्यात आले.
शैक्षणिक प्रगतीमध्ये शिक्षकांचे मोठे महत्व असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य सामाजिक जाणिवेतून करतांना आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे जागरुकपणे पाहण्याची गरज आहे. शिक्षकाबदलचा समाजातील दृष्टीकोन चांगला राहिल याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षक आपले ज्ञानदानाचे कार्य नेटाने पार पाडतात. जिल्हा परिषद स्तरावरील शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्याचा मानस व्यक्त करुन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व शिक्षकांना जिल्हयात ई-लर्निग या अद्यावत शिक्षण पध्दतीचा प्रभावीपणे अवलंब करुन ज्ञानदानाचे कार्य जोमाने करण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करुन म्हणाल्या की, समाजाच्या विकासामध्ये सर्वात जास्त योगदान हे शिक्षकांचे आहे. शिक्षणाचा दर्जा वाढवला गेला तर समाज अधिक विकसित होईल. शिक्षकांना वेगवेगळया पातळीवर प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षकांनी शाळाबाहय मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांच्यावर चांगले संस्कार घडवावेत तसेच इतर शासकीय योजना नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकते .
संतोष हंगे म्हणाले, खाजगी शाळांच्या तुलनेने जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये अग्रेसर होत आहेत. विविध जाती-धर्माची मुले-मुली जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेत असल्याने या शाळा ख-या अर्थाने सर्वधर्मसमभावाची संस्कृती जोपासण्याचे काम करीत आहेत. समाज घडविण्याच्या या कार्यात शिक्षकांनी आपले योगदान वाढवावे असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात सभापती राजेसाहेब देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विविध उपक्रमांची माहिती देऊन जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठीच्या निवड पध्दती बद़दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 20 शिक्षकांचा पुरस्कार देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षक रोहीणी गंगाधर माळीवाडीकर आणि विष्णू ननावरे यांनी प्रातनिधिक मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.
या समारंभास जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी तर आभार प्रदर्शन गौतम चोपडे यांनी केले.
No comments:
Post a Comment