बप्पांचा फेरफटका

Friday, September 14, 2018



मित्रहो ,गेल्या काही दिवसांपासून आमच्या बप्पाला अर्थात गणरायाला अनेक निमंत्रणे येत होती .अनेकांनी तर खास दूत पाठवले होते. शेकडो ई-मेल आणि व्हॉट्सऍप मेसेज येत होते. प्रत्येक घरातूनच निरोप येत होता म्हणा.



निमंत्रण देणाऱ्यात राजकीय मंडळी ,अधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचाही समावेश होता. बप्पालाही देवलोकात राहण्याचा कंटाळा आला होता. निमंत्रणे येत आहेत तर चार- आठ दिवस जाऊन फिरून यावे असा विचार बप्पाने केला .पण जाणे सोपे नव्हते. त्यापूर्वी काहीजणांची परवानगी घेणे आवश्यक होते. मग काय बाप्पा कामाला लागला .त्याने भराभर पत्रे लिहिली आणि उंदीर मामाला लखोटे घेऊन रवाना केले. पहिला लखोटा अर्थातच इंद्रदेवाकडे गेला .कंटाळलेल्या बाप्पाला थोडीशी मोकळीक मिळावी म्हणून इंद्राने लगेच परवानगी देऊन टाकली .बप्पाने उंदीर मामाला पुन्हा आणखी दोन बंद पाकिटे दिली .त्यापैकी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे होते .ते दोन लखोटे पाहून उंदीरमामाच्या लक्षात आले .काम तसे कठीण होते .

त्यातही मोदींकडे लखोटा पोहोचवणे सोपे पण मुंबईत फडणवीस यांना पत्र देणे कठीणच होते .मोदी टेक्नोसॅव्ही असल्याने उंदीर मामाने शक्कल लढवली आणि ऑनलाइन परवानगी मिळवली. फडणवीस यांच्याकडे मात्र उंदीरमामाला अनेक खेटे घालावे लागले. 'अभिमन्यू'चा चक्रव्यूह भेदणे उंदीर मामाला कठीण वाटू लागले .पण त्यातही शक्कल लढवून उंदीरमामाने अभिमन्यूलाच 'मामा 'बनवले. अखेर परवानगी मिळाली. लगेचच बाप्पाने बांधाबांध सुरू केले ,बॅगा भरल्या आणि उंदीर मामाला भुलोकाच्या दिशेने निघण्याचा आदेश दिला. भूलोकावर जायचे म्हटले की उंदीरमामा चिंताग्रस्त झाला. जाताना स्वर्गातूनच पेट्रोल आणि डिझेल भरून घ्यावे असा सल्ला त्याने बाप्पाला दिला .पृथ्वीवरील इंधनाचे भाव ऐकून त्यालाही धसकी बसली होती. अखेर आपल्याला आवश्यक इंधन सोबत घेऊन उंदीरमामा आणि बाप्पा रवाना झाले. मजल-दरमजल करत चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांनी भूलोकी 'लँड' होण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या वेळेप्रमाणे बाप्पा आणि मामा जसजसे जवळ येऊ लागले तसतसे त्यांना काहीतरी जाणवू लागले. चोहोबाजूंनी कर्णकर्कश्श आवाज येत होते .डीजे तर लावायचा नाही असा निर्णय झाल्याचे बाप्पाने ऐकले होते. कदाचित दुसरा कुठला तरी आवाज असावा असे समजून ते पुढे जाऊ लागले .

इतर ठिकाणचे माहित नाही पण लातूरात कलेक्टरांनी डीजेला परवानगी नाही ,नाही ,नाही असे सांगितल्याचे बाप्पाने वाचले होते .त्यामुळे आणि डीजे लावायचा असेल तर आईची परवानगी आणा असेही सांगितल्याचे बाप्पाच्या वाचण्यात होते .त्यामुळे बाप्पा आणि उंदीरमामा लातुरकडे वळले .लातुरात अनेकांनी आई आणि बहिणीचीही परवानगी घेतल्याचे मामाने सांगितले कारण अनेक ठिकाणी डीजे वाजत होता .डिजेवर भक्तीगीत वाजतील असे बाप्पाला वाटले .शूर्पकर्ण असणारा बप्पा तल्लीन झाला पण उंदीर मामा भलताच हुशार आणि त्याचे कानही तिखट .'शांताबाई 'चा आवाज त्याच्या कानातून सुटला नाही. 'शांताबाई ' चे रडणे थांबत नाही तोपर्यंत 'सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?' असा प्रश्न थेट बाप्पांच्या कानावर पडला. 

आपल्याला नसेल दुसऱ्या कोणाला तरी हा प्रश्न विचारण्यात आला असेल असे समजून बाप्पा आणि उंदीरमामा पुढेपुढे जाऊ लागले. आपल्याला मुक्कामी बोलावणाऱ्यांनी स्वागताची तयारी केल्याचे बाप्पा आणि उंदीरमामा पाहू लागले .काही ठिकाणी अगदी आरामात राहण्याची सोय होती पण काहींनी मात्र जीवाला घोर लागावा अशीच सोय केली होती .भर रस्त्यात आणि त्यातही पत्र्याचा डबा किंवा कापडी पडदा ठोकून बप्पाला तेथे राहण्यास सांगण्यात आले होते .पावसाळ्याचे दिवस असल्याने आता भिजतच राहावे लागणार याची बाप्पाला खात्रीच झाली आणि हो रस्त्याच्या मध्यभागी बसायचे म्हणजे जाता-येता एखाद्या वाहनाने धक्का दिला तर ?हा विचार बाप्पाच्या मनात आला. पण तेवढ्यात उंदीरमामाने सोल्युशन सांगितले .

 बाप्पा आपले भक्त रात्र आणि दिवस तुमच्या साक्षीने 'पारायण' करणार आहेत असे उंदीर म्हणाला . हे ऐकून बप्पा सुखावला आणि उंदीरमामा हळूहळू पुढे सरकू लागला. निमंत्रणे तर खूप होती .एकाच वेळी सगळ्यांचा पाहुणचार घेता येणार नाही .त्यामुळे दररोज काही जणांकडे जावे असा निर्णय बाप्पाने घेतला. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,आ . सुधाकर भालेराव ,आ. विनायकराव पाटील ,आ.अमित देशमुख, त्र्यंबक भिसे आणि बसवराज पाटील यांचाही निरोप आलेला होता .कलेक्टरांनी तर थेट माणूसच बाप्पाच्या मागावर ठेवला होता .आणखी कितीतरी निमंत्रणे होती .जावे कुठे ?असा विचार बप्पा करू लागला. एकाकडे जावे तर दुसऱ्याला राग आणि न जावे तर आणखीच .

त्यामुळे मग बाप्पाने पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळांच्या मंडपात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला .दुसऱ्या दिवसापासून पाहुणचार घेऊ असे त्याने उंदीरमामाला सांगितले .उंदीर मामा ने हा प्रस्ताव ऐकला आणि बाप्पाला मंडपात सोडून कानोसा घेण्यासाठी उंदीर मामा रवाना झाला जेथे जायचे आहे तेथील कानोसा घ्यावा असा विचार करून उंदीर मामाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपातून धूम ठोकली.....
श्रीकांत धर्माधिकारी 
मो .९४०३४८९५९५




मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment