विश्वशांती व पावसासाठी निलंगा येथे पालकमंत्र्यांनी सुरू केला यज्ञ

Monday, September 10, 2018


लातूर: विश्वशांती आणि पाऊस पडावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंगा येथे  पर्जन्ययाग सुरू झाला आहे .रविवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी निलंग्याचे ग्रामदैवत निळकंठेश्वरास अभिषेक करून या पर्जन्ययागाला प्रारंभ झाला आहे .

यावर्षीच्या पावसाळ्यात लातूर जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही .थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या  केल्या असल्या तरी पिके जगण्याची खात्री नाही .पाऊस नसल्यामुळे प्रकल्पातही पाणी साठा झालेला नाही .यामुळे भविष्यात पाणीटंचाई जाणवणार  आहे . ही संकटे दूर व्हावीत यासाठी निलंगा येथे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेऊन पर्जन्यवृष्टी यज्ञ सुरू केला आहे . रविवारी पालकमंत्र्यांनी स्वतः पूजन करून प्रार्थना केली .हा यज्ञ चार दिवस दिवस चालणार आहे .मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या यज्ञाची पूर्णाहुती होणार आहे .

पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर कर्तव्य भावनेने वागतात .लातूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर असल्याची त्यांना जाणीव आहे. यामुळेच लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी त्यांनी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवले. जिल्ह्यात शोषखड्डे घेऊन पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवली .वृक्षारोपण करून  जिल्हा  हिरवागार व्हावा  आणि पावसाचे प्रमाण वाढावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत .गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप दिल्याने ते अस्वस्थ झाले होते. यामुळेच पाऊस पडावा यासाठी पालकमंत्र्यांनी पर्जन्ययाग आयोजित केला आहे . पर्जन्य याग केल्याने पाऊस पडतो.  लातूरकर जनतेचा हा अनुभव  आहे .यापूर्वी लातूर येथे चार वेळा पर्जन्य याग करण्यात आला. प्रत्येक वेळी जोरदार पाऊस पडला .

यज्ञा दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाऊस पडतो असा दावा अनेकांनी केला .परंतु तो योगायोग ठरला. यज्ञात भवती पर्जन्य असे वचन आहे .या वचनाला अनुसरूनच राज्य सरकारने निधीची तरतूद केलेली आहे .पालकमंत्र्यांनी निलंगा येथे पुढाकार घेऊन स्वतः पर्जन्य याग सुरू केला याबद्दल त्यांचे दैनिक मराठवाडा नेता परिवाराच्यावतीने अभिनंदन. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाला जगन्नियंता परमात्मा आणि वरुण देवता अर्थात इंद्र देवाने प्रसन्न होऊन यश द्यावे हीच शुभकामना.

No comments:

Post a Comment