नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या दरांवर नरेंद्र मोदी गप्प का आहेत, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही पंतप्रधान बोलत नाहीत, ते गप्प का आहेत? अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने आज भारत बंद पुकारला असून धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
2014 मध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने रामलीला मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद यादव, यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. गॅसच्या किंमतीत सुद्धा भरमसाठ वाढ झाली असून हे दर ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यूपीएच्या काळात इंधनदराच्या किंमतींवरून देशभरात रान उठवणारे नरेंद्र मोदी आता मात्र गप्प बसले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
फक्त मोदींच्या उद्योगपती मित्रांना योग्य दिशा सापडली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप केला. 'तरुणांकडे रोजगार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे गॅसवर आहे. तरीही मोदी इंधनदरांवर एकही शब्द बोलत नाहीत. देशात महागाई वाढली आहे. बलात्काराच्या घटनेत भाजपचे नेते, आमदारांचा सहभाग उघड झाल्यानंतरही पंतप्रधान मोदी बोलायला तयार नाहीत. जीएसटीपासून राफेल कराराच्या प्रश्नांवर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी चुप्पी साधली आहे, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment