बंगळुरू : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ विमानात हवेतच इंधन भरण्याचा ऐतिहासिक विक्रम साकारून अशी प्रणाली असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ही माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी हा इतिहास रचण्यात आला.
हवेत २० हजार फूट उंचीवर वायू दलाच्या आयएल ७८ च्या इंधन भरणाऱ्या टँकरच्या माध्यमातून तेजस एलएसपी ८ मध्ये १९०० किलो इंधन भरण्यात आल्याचे एचएएलकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी रशियन बनावटीच्या आयएल-७८ एमकेआय टँकरच्या सहाय्याने हवेत इंधन भरण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. इंधन भरण्यात आले तेव्हा तेजस विमानाचा वेग २७० नॉट इतका होता. या यशासोबतच सैन्य श्रेणीतील विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्याची प्रणाली असलेल्या जगातील मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे..

No comments:
Post a Comment