हिंगोली / प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 23 सप्टेंबर रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. आयुष्यमान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून, यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. या योजनेअंतर्गत 1300 हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. हे उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये करता येणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना देखील सहभागी करुन घेतले जाणार असून हेल्थ ण्ड वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून, नागरिकांनी या योजने अंतर्गत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून सावध राहावे.
तसेच या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा यासाठी आशाताई सेविकांची जबाबदारी वाढली आहे. तसेच लोकप्रतिनीधीनी देखील या योजेनेचा व्यापक प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांना या महत्वाच्या योजनेची माहिती करुन द्यावी असे ही पालकमंत्री कांबळे म्हणाले. यावेळी आयुष्यमान भारत योजने सोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा यावेळी निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ई-कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले तर डॉ. कवटे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, आशाताई सेविका, नागरिकांची मोठ्या उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment