लिंबोटी धरणातून उदगीरला एक थेंबही पाणी घेवू देणार नाही-आ.चिखलीकर

Thursday, September 20, 2018

विशेष प्रतिनिधी
नांदेड-लिंबोटी धरणातील एक थेंबही पाणी उदगीरला घेवून जावू देणार नाही असा इशारा कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दिला आहे.

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 19 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात कंधार-लोहा विधानसभा मतदार संघातील प्रलंबीत विकास कामांना चालना देण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार चिखलीकर यांनी या बैठकीत मतदार संघातील मंजूर विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात विलंब होत असल्यामुळे शासनाचा निधी प्राप्त होवूनही कामांना सुरुवात होवू शकत नसल्याची खंत व्यक्त करुन प्रस्तावित मंजूर विकास कामांतील त्रुट्या लवकरात लवकर दुरुस्त करुन प्रस्ताव त्वरीत सादर करण्याच्या सूचना केल्या.

भौगोलीकदृष्ट्या योग्य नसतानाही पाटबंधारे विभागाने लिंबोटी धरणातून उदगीरला पाणी पुरवठा योजना कार्यन्वित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लिंबोटी धरणाच्या मृत पाणी साठ्यातून उदगीरची पाणीपुरवठा योजना करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत लिंबोटीचे एक थेंबही पाणी उदगीरला घेवून जावू देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची आपली तयारी असल्याचा इशारा आ.चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या साक्षीने पाटंबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्याला दिला आहे.
अहमदपूरच्या हिस्स्याचे पाणी त्यांना देण्यास हरकत नाही परंतु मृत पाणी साठ्यातून पाणी उचलू देणार नाही. लिंबोटी धरण हे मतदार संघातील जनतेच्या सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे. उठसूठ कोणीही लिंबोटी धरणातून पाणी पळविण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही असा खणखणीत इशारा आ. चिखलीकर यांनी यावेळी दिला.

मतदारसंघातील माळेगांव यात्रा परिसराचा विकास करण्यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी दफ्तर दिरंगाईमुळे अद्याप त्या कामांना सुरुवात झाली नाही. लोहा येथील आयटीआयची इमारत बांधकाम विभागाने अपूर्ण असतानाही पूर्ण झाल्याचा खोटा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला असल्यामुळे आयटीआय प्रशासन व बांधकाम विभागाच्या वादात ही इमारत अडकली आहे. लोहा व कंधार तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहासाठी अद्याप जागेची उपलब्धता झाली नसल्यामुळे वस्तीगृहाचे काम सुरु होवू शकले नाही. कंधारच्या ग्रामीण रुग्णालयास 50 खाटांची मंजूरी प्राप्त होवून दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी जागेचा प्रश्‍न अद्याप निकाली निघाला नाही. नॅशनल हायवेच्या 100 फुटाच्या जागेतून रस्ता होणार आहे. या जागेत शेतकर्‍यांचे विंधन विहिर, बोअरवेल, घरे आली आहेत. त्या शेतकर्‍यांना मावेजा देण्यात यावा आदि प्रश्‍न आ. चिखलीकर यांनी या बैठकीत मांडले. जिल्हाधिकार्‍यांनी आमदारांच्या प्रश्‍नांची गंभीर दखल घेवून संबंधित अधिकार्‍यांना प्रस्तावित कामातील त्रुट्या त्वरीत दूर करुन ही विकास कामे लवकारात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. कामांतील त्रुट्या दूर करुन आठ दिवसात अहवाल सादर करा अन्यथा दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही अशी तंबीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिली.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, कंधारचे उपविभागीय अधिकारी बोरगांवकर, लोहा व कंधारचे तहसिलदार, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सब्बीनवार, जीवन प्राधिकरण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके, राष्ट्रीय महामार्गाचे मिठ्ठेवाड, बांधकाम विभागाचे उपअभियंता संतोष क्षिरसागर, जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील, माजी नगराध्यक्ष जफरोद्दीन, किरण वट्टमवार, दत्ता वाले, साहेबराव काळे, सरपंच झुंबाड, पत्रकार प्रल्हाद उमाटे, आदिंची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment