ड्रोनचेे प्रात्यक्षिक व चर्चासत्राचे आयोजन
लातूर /प्रतिनिधी :कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून विविध कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे .यासंदर्भात राज्य शासन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्यामध्ये लोदगा येथे आयोजित कार्यक्रमात करार केला जाणार आहे. यावेळी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली .
पत्रकारांना माहिती देताना पाशा पटेल म्हणाले की ,गेल्या काही दिवसात शेतीवर अनेक संकटे येत आहेत. यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे .ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची किती क्षेत्रावर पेरणी केली आहे याची अचूक माहिती मिळू शकते. पिकावर रोगराई पसरली असेल तर नेमकी कोणत्या परिसरात ती पसरली आहे याचीही माहिती मिळू शकते .नैसर्गिक आपत्ती आली तर त्याची व्याप्ती किती आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो.
शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते ही बाब लक्षात घेता आपण बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेशी संपर्क साधला होता .या संस्थेने शेतीसाठी उपयोगात येणारे ड्रोन तयार केले आहेत .त्याची पाहणी केल्यानंतर हे तंत्रज्ञान मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्या शास्त्रज्ञ सोबत चर्चा केल्यानंतर हे तंत्रज्ञान वापरण्यास अनुमती दिली .यासंदर्भात शासन आणि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स यांच्यातील करार लोदगा येथे दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात केला जाणार आहे.
लोदगा येथे फिनिक्स फाउंडेशन व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत .
दिनांक 24 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे शास्त्रज्ञ प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. सकाळी 11 ते 1 या कालावधीत हे प्रात्यक्षिक होणार आहे .हे ड्रोन दहा किलोमीटर परिसरात जाऊन सर्वेक्षण करू शकते .या सर्वेक्षणाची माहिती एका मोठ्या स्क्रीनवर उपस्थितांना पाहता येणार आहे .याच दिवशी दुपारी २ ते ३.३० या कालावधीत शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. सायंकाळी ४ ते ६ या कालावधीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि राज्यातील चारही प्रमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची बैठक होणार आहे .दुसरे दिवशी हे सर्व शास्त्रज्ञ आणि लोदगा येथील विद्यार्थी यांच्यात चर्चासत्र होणार असल्याचे पाशा पटेल म्हणाले. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून भविष्यात या माध्यमातून 70 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो .
या ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी बेंगलोर येथून शास्त्रज्ञ आणि त्यांचे 13 सहकारी उपस्थित राहणार आहेत .या विषयाच्या अनुषंगानेच बदलत्या हवामानाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम यासंदर्भात दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय चर्चासत्र होणार आहे .नागरी उड्डयण मंत्रालयाचे मुख्य सचिव यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे .पोकराचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या चर्चासत्रास राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर ,राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सचे डॉ.केपीजे रेड्डी ,मुख्य शास्त्रज्ञ डॉ एन एन ओमकार ,प्रमुख शास्त्रज्ञ डॉ जी गोपालन यांच्यासह मार्गदर्शक म्हणून परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्यंकटेश्वरलू यांची उपस्थिती राहणार आहे .या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी असे आवाहन पाशा पटेल यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment