महालक्ष्मी सणानिमित्त बाजारपेठ सजली

Sunday, September 16, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
विघ्नहर्ता गणरायांच्या स्थापनेनंतर शनिवारपासून महालक्ष्मी सणास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हिंगोलीची बाजारपेठ सजली होती. महालक्ष्मीच्या आकर्षक मुखवट्यासह मूर्ती तसेच सजावटीच्या साहित्याची खरेदी करताना ग्राहकांनी गर्दी केली होती. 

हिंदू संस्कृतीत गौरी पूजनाला अनन्य साधारण महत्व आहे. शनिवारपासून ज्येष्ठा गौरींना आवाहन देण्यात येणार असून, रविवारी पूजन केले जाणार आहे. तर सोमवारी ज्येष्ठागौरी सणाचे विसर्जन होणार आहे. या सणानिमित्त बाजारात आकर्षक मुखवट्यासह महालक्ष्मीच्या पूर्णाकृती मूर्ती खरेदी करण्यात आली. या शिवाय सजावटीचे साहित्यही खरेदी करतांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 विशेष म्हणजे नवविवाहित लेकीबाळीला माहेरची मंडळी महालक्ष्मींचे मुखवटे देत असतात, अशी परंपरा आहे. तसेच घरातील खूप दिवसांपासून असलेल्या लक्ष्मींचे मुखवटे बदलून नव्याने विधीवत स्थापनाही केली जाते. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून बाजारात ठिकठिकाणी महालक्ष्मीच्या पूर्णाकृती मूत्र्या, मुखवटे, मखरासाठी लागणारे साहित्य, सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. महालक्ष्मींच्या पूर्णाकृती मूत्र्या एक हजार रूपयांपासून तीन हजार रूपयांपर्यंत आहेत. तर मुखवट्यांची तीनशे पासून दोन हजार रूपयापर्यंत विक्री होत होती. हिंगोलीच्या बाजारपेठेत दिवसभर महालक्ष्मीच्या सणानिमित्त नागरिक खरेदी करतांना दिसून आले.

No comments:

Post a Comment