हो..! मी रेशनचा माल हजार रूपये क्विंटलने खरेदी करून सतराशेने विकायचो

Saturday, September 22, 2018

चौकशीदरम्यान आडत व्यापाऱ्याची कबुली
हिंगोली / प्रतिनिधी
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील आडत दुकानावर धाड मारून बाळापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर यांनी रेशनचे 85 गव्हाचे पोते शुक्रवारी 21 सप्टेंबर रोजी पकडले होते. संबंधीत आरोपीची पोलिसांनी चौकशी केली असता मी किरकोळ रेशन दुकानदाराकडून हजार रूपये प्रतिक्विंटलने रेशनचा माल खरेदी करून नांदेड येथे सतराशे रूपये क्विंटलने विकायचो, अशी कबुली आरोपी आडत व्यापाऱ्याने दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. 
          वारंगा फाटा येथील दुर्गादास अग्रवाल यांच्या अडत दुकानात रेशनचा गहू असल्याचे बाळापूर पोलिसांना समजले होते. त्यानंतर बाळापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेख बाबर, भगवान वडकिल्ले, गजानन भालेराव, गजानन मुटकुळे, संजय मार्के यांनी यावर कार्यवाही करत सदरील दुकानातून प्रत्येकी 80 किलो वजनाचे 85 गव्हाचे पोते जप्त केले आहेत. याची किंमत अंदाजे 1 लाख 2850 रूपये एवढी आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधीत आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने मी ग्रामीण भागातील स्वस्तधान्य रेशन दुकानदारांकडून रेशनचा माल एक हजार रूपये क्विंटल प्रमाणे खरेदी करतो व नांदेड येथे साध्या पोत्यात भरून सतराशे रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकतो. यापुर्वीही अशा प्रकारे मी माल गोळा करून नांदेडला विकला आहे. पण, नांदेड येथे रेशनचा गहू पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पकडल्यामुळे तेथील यंत्रणा सतर्क असल्या कारणाने हा रेशनचा गहू मी माझ्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता, अशी कबुली आरोपी दुर्गाप्रसाद अग्रवाल याने चौकशीदरम्यान दिल्याची विश्वसनिय माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणी जवळपास आरोपीची सात तास चौकशी करण्यात आली. अचानक आरोपीच्या छातीत दुखत असल्याने त्यास नांदेड येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याप्रकरणी आडत व्यापाऱ्याविरूद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून हा काळा बाजार सुरू असल्याने यामध्ये नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील आडत दुकानदार, राशन दुकानदार यांच्यात मोठी उलाढाल झाल्याची चर्चा आता सुरू आहे. या प्रकरणामुळे अनेक छोटे, मोठे मासे गळाला लागणार आहेत. सदरील प्रकरणात आरोपीची संख्या वाढू शक्यता वर्तविली जात आहे. बाळापूर पोलीस ठाणे हद्दीदरम्यान, रेशनच्या मालावर झालेली ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे समजते

No comments:

Post a Comment