मुरुम,ता.२६( बातमीदार): कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील लोकांचा,शेतकरी,व्यापाऱ्यांचा आर्थिक विकास व उन्नती व्हावी यासाठी आपण हा साखर कारखाना उभा केला आहे.कारखान्यावर हजारो कुटूंबाची रोजीरोटी अवलंबून आहे.अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.साखर कारखान्यांना दर वर्षी वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कारखानदारी अडचणीत असून निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कमी तर कधी जास्तीचा पाऊस पडतो.मागील वर्षी चांगला पाऊस झाला होता.ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले होते. गाळप चांगले झाले पण साखरेचे दर उतरल्याने कारखानदारी अडचणीत आली आहे.सभासदांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून जादा उत्पादन व जादा साखर उतारा देणा-या जातीचा ऊसाची लागवड करावी असे आवाहन चेअरमन आमदार बसवराज पाटील यांनी गुरुवार(ता.२७) रोजी मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील,कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी,जिल्हा बँकेचे संचालक दत्ता पाटील,चंदरमामा पाटील,विजयकुमार सोनवणे,उमरगा पं.स.चे सभापती मदन पाटील,जि.प.सदस्य रफीक तांबोळी,विलास राजोळे,प्राचार्य डॉ.दिलीप गरुड,अँड. इरसिंगप्पा आळंगे,अँड.प्रदिप पनुरे,अँड.विश्वनाथ पत्रिके आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले की,कारखान्याने उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर काटकसर करून साखर उतारा जास्ती ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहीलो.ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.ऊस हे नगदी पीक असून हमीभाव असणारे हे पीक आहे. साखर कारखानदारी ही ग्रामीण भागाची संजीवनी आहे. कारखाना कर्जमुक्त झाल्याचे सांगून कारखानदारी ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे.या वर्षी कार्यक्षेत्रात सात लाख मे.टन.ऊस आहे.विजयादशमी दस-याच्या मुहुर्तावर कारखाना सुरू करणार आहे.
कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही याची खात्री देऊन परिपक्व ऊस आपल्या हक्काच्या कारखान्याला देऊन सहकार्य करावे. विठ्ठलसाईचे राज्यभर नावलौकिक व्हावे यासाठी आपल्या सहकाऱ्यांची गरज आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक एम. बी.अथणी यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला व त्यानंतर अहवाल वाचन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु पाटील यांनी केले तर संचालक विठ्ठलराव बदोले यांनी आभार मानले.यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद,शेतकरी,विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विठ्ठलसाई कारखाना कर्जमुक्त करुन किल्लारी कारखान्याचे २८ कोटी भरले व १३ कोटी सामोपचार योजनेतून माफ करुन घेतले. केवळ चार कोटी रुपये कर्ज असलेला किल्लारी कारखाना वीस वर्षाऐवजी कमी कालावधीसाठी देऊन या कारखान्याच्या निवडणूका घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

No comments:
Post a Comment