अंबाजोगाई (प्रतिनिधी)-- अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात पुन्हा एकदा पन्नास वर्षीय रुग्ण महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन चार पीळ पडलेला साडेतीन किलो वजनाचा अंडाशयाचा गोळा काढून महिलेचे प्राण वाचवण्यात प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या टीम ला यश मिळाले आहे.
येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी गेली अनेक वर्षापासून महिलांच्या पोटातील गोळा काढण्याच्या अनेक अवघड शस्त्रक्रिया पुर्ण केल्या असून त्यांचे व या वैद्यकीय महाविद्यालयाचे नांव सर्वदुर पसरले आहे. या मुळेच गंगाखेड तालुक्यातील पुसद येथील ५० वर्षीय महिला पोट दुःखीच्या आजारामुळे त्रस्त असलेली महिला या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागात उपचारासाठी आली होती. गंगाखेड येथे सोनोग्राफी केल्यानंतर सदरील महिलेस पोटात अंडाशयाचा गोळा असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्या महिलेस खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अशक्य होते.
त्या महिलेने सरळ स्वा.रा.ती.वैद्यकीय महाविद्यालयातील अंबाजोगाई चे स्त्रीरोग विभाग गाठले. त्या ठिकाणी डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेस भरती करून यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिये दरम्यान ३.५ किलोचा अंडाशयाचा गोळा काढण्यात आला. सदरील गोळ्याच्या देठाला चार पीळा बसल्या होत्या. त्या पिळा सरळ करून गोळा काढण्यातआला. दुसऱ्या अंडाशयाला पण गाठी असल्यामुळे ते अंडाशय तसेच गर्भपिशवी ही काढण्यात आली. सदरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा जीव वाचला. या महिलेच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. रुग्णाच्या भरती होण्यामुळे घरातील इतर व्यक्तींची खाडे पडून मजुरी बुडत होती. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर महिला सुट्टी साठी आग्रह धरत होती. डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेच्या शस्त्रक्रियेचे विरघळवण्याचे टाके दिल्यामुळे महिलेचे आरोग्य पूर्ववत झाले. त्या महिलेस सहाव्या दिवशी सुट्टी देण्यात आली.
मागील सहा महिन्यामध्ये स्त्रीरोग विभागात गर्भाशयाच्या, अंडाशयाच्या, गर्भनलिकेच्या विविध आकाराच्या व वजनाच्या एकूण ६० शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. तसेच यापूर्वी या महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात १० किलोपर्यंत च्या गोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे.
या शस्त्रक्रियेमध्ये डॉ संजय बनसोडे यांना डॉ.मिताली गोलेच्छा, डॉ. प्रवीण राजपुत, डॉ. वर्षा वरपे,डॉ. ज्योती डावळे,डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई,डॉ. अर्चना पारसेवार,डॉ. अभिजित पाटील,डॉ. प्रियांक दासीला,डॉ. पुष्पदंत रुग्गे यांचे सहकार्य लाभले. डॉ. गणेश निकम,डॉ. प्रसाद मुळे, डॉ. निकिता यांनी भुलतज्ञाचे कार्य पाहिले. स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार,डॉ. राकेश जाधव,डॉ. नितीन चाटे यांनी स्त्रीरोग विभागाचे अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment