स्वच्छतेची जबाबदारी सर्वांचीच- वसुधा फड

Sunday, September 30, 2018


लातूर,दि. 29 : स्वच्छता ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी असून, प्रत्येकांनी स्वच्छतेची सुरूवात स्वत:च्या घरापासून करण्याची गरज आहे, असे मत लातूर महापालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी शनिवारी येथे बोलताना व्यक्त केले. 

येथील राजमाता जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी प्रभाग क्र. 15 मध्ये नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छता जनजागरण रॅली काढली. या रॅलीचा हिरवा झेंडा दाखवून त्यांनी शुभारंभ केला, त्यावेळी फड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डी.एन. केंद्रे हे होते. याप्रसंगी संस्थेच्या समन्वयक स्वाती केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, नगरसेवक संगीत रंदाळे, ऍड. दीपक मठपती, नगरसेविका वर्षा कुलकर्णी, श्वेता लोंढे, क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक सिद्धाजी मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

शहरात साथींचे आजार होऊ नयेत यासाठी लातूर महापालिकेच्यावतीने स्वच्छता जागरण पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवाड्यात समाजातील सर्व घटकांनी शहर कचरामुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही वसुधा फड यांनी केले. प्राचार्य डी.एन. केंद्रे यांनी स्वच्छतेची ही मोहिम यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची गरज असल्याचे सांगितले. संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक एस.व्ही. वायचळ यांनी केले. मदन धुमाळ यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment