हैदराबाद: मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. तेलंगणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीचं सरकार आहे. या सरकारचा कार्यकाळ 2 जून 2019 पर्यंत आहे. मात्र त्यापूर्वीच सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे तेलंगणात वेळेआधीच निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राव हे ६ तारीख शुभ मानतात. त्यामुळेच त्यांनी आजच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, तेलंगणात सहा महिन्यांच्या आत विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 2 जून 2019 पर्यंत होता. त्यामुळे तिथे लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या. मात्र चंद्रशेखर राव यांनी त्यापूर्वीच म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसोबत तेलंगणाच्या निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली आहे. त्यासाठीच विद्यमान विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मागील आठवड्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच राज्यात मुदतपूर्व निवडणुका होण्याची चर्चा सुरू झाली होती. कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. टीआरएस आणि भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून जवळीकताही वाढली होती. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या होत्या.
नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा विधानसभा सदस्यांची संख्या 119 इतकी आहे. यामध्ये सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) 90, काँग्रेस 13 आणि भाजपचे 5 आमदार आहेत.

No comments:
Post a Comment