सकाळी फिरायला गेलात की पावलागणिक विविध फळभाज्या आणि फळांचे रस विकणारे विक्रेते दिसतात. अनेक जॉगिंग पार्कच्या बाहेर गव्हांकुर, कारलं, दुधी भोपळा, गाजर अशा फळभाज्यांचे रस विकले जातात. त्यातूनच कधी तरी आरोग्याला घातक ठरणाऱ्या रसांचं सेवन केलं गेल्यास आरोग्याला गंभीर धक्का बसू शकतो. अलीकडेच अशी घटना घडून गौरी शहा या तरुणीचा मृत्यू झाला. त्यांनीही जॉगिंगनंतर कारलं आणि दुधी भोपळ्याचा रस एकत्र घेतला होता. पण काही वेळातच त्यांना अत्यवस्थ वाटायला लागून तब्येत अचानक बिघडली. दवाखान्यात दाखल केल्यानंतर तीनच दिवसांत ब्रेन हॅमरेजने त्यांचा मृत्यू झाला. या बातमीने दुधी खावा की नाही, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. मूलत: दुधीचे दोन प्रकार पडतात. त्यापैकी कडू दुधी हा आरोग्यास हानीकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. कडू दुधी हा रेचन करणारा समजला जातो. म्हणजे याच्या सेवनाने उलटी आणि जुलाबाची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. आयुर्वेदात कडू दुधीचा वापर औषधाच्या स्वरूपात केला जातो. औषधात त्याचा अत्यंत कमी मात्रेत उपयोग केला जात असल्याने कडू दुधी भोपळ्याचे दुष्परिणाम तितके जाणवत नाहीत. याउलट गोड दुधी भोपळा हृदय बलिष्ठ करणारा आहे. दुधी भोपळ्यात शरीराला रोजच्या गरजेपेक्षा अधिक 'अ' जीवनसत्त्व असतं, तर १९ टक्के 'क' जीवनसत्त्व असतं. पण कडू भोपळा हा मळमळ निर्माण करणारा आहे. .
आपल्याकडे अनेक भाज्या कच्च्या किंवा रसाच्या स्वरूपात सेवन करण्याची पद्धत आहे. रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणं ही काही आजारांसाठी चांगली बाब असल्याचं मानलं जातं आणि अनेक संशोधनांमधूनही याला पुष्टी मिळाली आहे. अनेक आयुर्वेदतज्ज्ञ आणि निसर्गोपचारतज्ज्ञ मधुमेह, उच्च रक्तदाब, वाईट प्रकारच्या कोलेस्टेरॉलमध्ये झालेली वाढ, बद्धकोष्ठता, हृदयविकार, मूत्रपिंडाच्या समस्या आणि नैराश्य यासारख्या विकारांसाठी दुधी भोपळ्याचा रस सुचवतात. अनेक जण तो रोजही पीत असतात. काही प्रसिद्ध आयुर्वेदिक कंपन्या दुधी भोपळ्याची तयार पूडही विकतात. ही पूड फक्त पाण्यात घालून प्यायची असते. बहुतेक लोकांना याचा लाभ होत असल्याचं दिसतं. मात्र या महिलेच्या मृत्यूनं दुधी भोपळ्याच्या आणि इतर सर्वच भाज्या व फळं यांच्या रसाविषयी कोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगली पाहिजे, याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. .
आजकाल दुधी भोपळा किंवा काकडीवर्गीय फळांचं सेवन रसाच्या किंवा सॅलडच्या स्वरूपात केलं जातं. काकडीच्या कुटुंबातील वनस्पतींमध्ये कुकरबिटॅसिन हे गुंतागुंतीचं संयुग आढळतं. काकडी, खिरा किंवा भुरा कोहळा, टरबूज, कलिंगड, भोपळा, दुधी भोपळा यासारख्या भाज्यांमध्ये असणाऱ्या टेट्रासायकलिक ट्रिटरपेनॉइड कुकरबिटॅसिन संयुगांमुळे या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये कडवटपणा येतो. हे संयुग सस्तन प्राण्यांसाठी अत्यंत विषारी आणि म्हणूनच प्राणघातक ठरतं. रस कधी प्यावा याचंही शास्त्र असतं. रस हा ताजाच काढलेला असावा लागतो किंवा मग थोडी महाग पडली तरी दर्जेदार कंपन्यांनी तयार केलेली दुधी भोपळ्याची पूड डॉक्टरी सल्ल्यानं वापरणं आवश्यक असतं. परंतु रस काढल्यावर जसजसा शिळा बनत जातो, तसतशी त्यात विषारी संयुगं तयार होतात किंवा ती तीव्र बनतात. पण ही गोष्ट पाळली गेली नाही तर बराच काळ आधी काढलेले तयार रस प्यायल्यामुळे अशा दुर्घटना घडू शकतात. म्हणून दुधी भोपळ्याचा रस थोडा जरी कडू वाटला तरी तो बिलकूल पिऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
या ४१ वर्षीय महिलेला १२ जूनला सकाळी रस प्यायल्यानंतर जेमतेम अध्र्या तासातच उलट्यांचा भरपूर त्रास सुरू झाला. त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये तिची प्रकृती झपाट्यानं खालावत गेली आणि १६ जूनच्या रात्री आरोग्याच्या काही गुंतागुंती उद्भवल्यामुळे मृत्यू झाला. वास्तविक रस पिण्याआधी तिची तब्येत ठणठणीत होती आणि आधी कोणत्याही प्रकारचा आजारही नव्हता, असं तिच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं गेलं आहे. साहजिकच वरदान ठरणारा रस जीवघेणा कसा ठरला, असा प्रश्न निर्माण होतो. दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यामुळे मृत्यू ओढावण्याची देशभरातील ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा काही दुर्घटना घडल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच 'आयसीएमआर'च्या तज्ज्ञांच्या समितीनं २०११ मध्ये असं स्पष्ट केलं होतं की, दुधी भोपळ्याच्या रसाची चव कडवट लागली तर तो बिलकूल पिऊ नये, कारण कडू रसात मृत्यूला कारणीभूत ठरणारी काही रासायनिक संयुगं असू शकतात. परंतु असे इशारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि तज्ज्ञांच्या आणि काही संबंधितांच्या वर्तुळापुरतेच ते मर्यादित राहतात, ही यातील दुर्दैवी बाब आहे. डॉक्टरांच्या मते, दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यामुळे दरवर्षी एक किंवा दोन व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यामुळे हा मृत्यूही रसामुळेच झाल्याची दाट शक्यता आहे. या घटनेमुळे दुधी भोपळ्याच्या रसाचा उपचार म्हणून वापर करणाऱ्या डॉक्टरांसमोर पेचप्रचंग निर्माण झाला असून दुधी भोपळ्याचा रस सरसकट वाईट आहे, असा गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. मात्र कडवटपणा जाणवला की दुधी भोपळ्याचा रस टाकून दिला पाहिजे, कारण या रसात कुकरबिटॅसिन नावाचं विषारी रासायनिक संयुग असतं. असा कडवट रस प्यायल्यानंतर प्रामुख्यानं आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे पोट बिघडणं, दुखणं, उलट्या, रक्ताच्या उलट्या होणं आणि रक्तदाब झपाट्यानं कमी होणं असे परिणाम दिसतात. .
हृदयरोग, मधुमेह किंवा आधीचा काही आजार असेल तर भोपळ्याचा कडवट रस झपाट्यानं अधिक वाईट परिणाम दर्शवतो. दुधी भोपळ्याचा कडवट रस प्यायल्यामुळे आजारी पडणाऱ्या लोकांमध्ये रक्ताच्या उलट्या होणं, रक्तदाब घसरणं आणि यकृतातील एंझाईम्सच्या पातळीत वाढ होणं अशी सर्वसामान्य लक्षणं दिसतात. ही लक्षणं सहसा अध्र्या तासाच्या आत दिसू लागतात. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या प्रकृतीनुसार रस प्यायल्यानंतर तीन मिनिटं ते तीन तासांदरम्यान ती जाणवू लागतात आणि दोन दिवसांपासून सात दिवसांपर्यंत टिकून राहतात. जठर आणि आतड्यातील बिघाडामुळेही अशी लक्षणं दिसू शकतात. आरोग्यासाठी भाज्या आणि फळं खाणं चांगलं समजलं जातं. पण कोणत्या भाज्या आणि फळं खावीत हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक भाज्यांचे आणि त्यांच्या रसांचे त्यांच्यामधील रासायनिक घटकांनुसार विशिष्ट गुणधर्म असतात.
आपलं शरीर, ऋतू, आहार आणि आजार यांचा विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानंच कोणताही ताजा रस पिणं चांगलं ठरतं. उसाचा किंवा द्राक्षाचा रस मधुमेही रुग्णांसाठी घातक ठरू शकतो. त्याप्रमाणेच हेही आहे. मात्र यामुळेच मधुमेही रुग्णांसाठी कडवट पदार्थ नेहमीच चांगला ठरतो, असाही गैरसमज पसरल्याचं दिसतं. परिणामी, कडवट पदार्थ प्यायल्यानं आरोग्य चांगलं राहतं, या समजातून लोक दुधी भोपळ्याचा कडवट रसही आनंदानं पितात, असं निरीक्षण काही अभ्यासांमधून समोर आलं आहे. मात्र दुधी भोपळ्यासारख्या काही फळभाज्यांच्या रसाच्या बाबतीत ते चुकीचं ठरतं. म्हणूनच कोणत्याही भाजीचा किंवा फळांचा रस स्वच्छता पाळून आपल्यासमोर काढून दिला गेला पाहिजे आणि रस पिण्याआधी त्यातील संयुगं, घटक यांच्याविषयीची शास्त्रीय माहितीही घेतली पाहिजे. शिवाय नेहमीच तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच असे उपाय केले जावेत, असं आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे. .

No comments:
Post a Comment