दोन जबरी चोऱ्या उघड, आरोपीकडून 4 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त

Saturday, February 2, 2019
हिंगोली / प्रतिनिधी
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत 9 नोव्हेंबर 2018 रोजी वारंगा फाटा येथे भरदिवसा चोरट्‌यांनी 3 लाख 88 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल पळविला होता. तसेच हिंगोलीत 2 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल याच चोरट्यांनी पळविला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 4 महिन्यानंतर या चोरीचा छडा लावला असून एकूण 4 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.




नोव्हेंबर महिन्यात कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे भरदिवसा चोरट्यांनी सोन्याचा मुद्देमाल व नगदी पैसे असा एकूण 3 लाख 88 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल घेवून धुम ठोकली होती. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. बाळापूर पोलीसांना या चोरीचा तपास लागत नसल्याने फिर्याददाराने हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारावर पाळत ठेवत तांत्रिक बाबीचा उपयोग करून या चोरीचा छडा लावला आहे. 


तसेच आरोपींची चौकशी केली असता आरोपीने हिंगोली पोलीस स्टेशन गुन्ह्यातील 8 तोळे सोन्याचे दागिने, 2 लाख 40 हजार रूपये चोरी केल्याचे कबुल केले. स्थानिक गुन्हे शाखेेने 1 फेबु्रवारी रोजी या गुन्ह्यातील आरोपी फिरोज खॉ साहेब खॉ वय 31 वर्ष रा. पुसद जि.यवतमाळ यास नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून दोन्ही चोऱ्यातील एकूण 4 लाख 13 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तब्बल 4 महिन्यानंतर ही जबरी चोरी उघड करण्यास पोलीसांना यश आले आहे. आरोपीचा अजून काही चोऱ्यांमध्ये समावेश आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार, बाळापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक व्यंक टेश केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सुभान केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक विनायक लंबे, बालाजी बोके, विलास सोनवणे, गणेश राठोड, संभाजी लेकुळे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, शंकर ठोंबरे, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, दिपक पाटील यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment