मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या आधी मुंबईत स्मारकाची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत ही प्रतिकृती उभारण्यात येणार असून, याची उंची २५ फूट असणार आहे. प्रतिकृतीच्या सहाय्याने तज्ज्ञ, सामान्य मुंबईकर आणि विशेष म्हणजे पर्यटकांकडून त्यांची मतं आणि सल्ले जाणून घेण्यात येणार आहेत.
समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी राज्य सरकारने एल ॲण्ड टी कंपनीकडे स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी सोपवली आहे. हे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून, या स्मारकासाठी राजभवनापासून १.२ किलोमीटर आणि गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर, तर नरिमन पॉईंटपासून २.६ किलोमीटर अंतरावर असलेली जागा निश्चित करण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
'फक्त मुंबईकरच नाही, तर तज्ज्ञ आणि पर्यटकांकडूनही आम्ही सल्ले घेणार आहोत. प्रतिकृती उभारण्यासाठी अद्याप जागेची निवड झालेली नसून त्याचा शोध सुरू आहे. फाऊंटन, काळा घोडा, गेटवे ऑफ इंडिया किंवा नरिमन पॉईंट यापैकी एका जागेची निवड करण्यात येईल. या ठिकाणी पर्यटकांची तसेच मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. यामुळे आम्हाला तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या बाबतीत सल्ले तसेच विरोध असल्यास त्यासंबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.
विशेष म्हणजे सर्वसामान्यही आपली मतं नोंदवू शकतात. योग्य आणि चांगले सल्ले विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. उच्चस्तरीय समिती प्रतिकृती उभारण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा विचार करत आहे, असेही त्यांनी सांगितलं..

No comments:
Post a Comment