'पुणे फेस्टिव्हल'मध्ये हेमा मालिनींचे नृत्य

Tuesday, September 11, 2018

पुणे-सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या ३० व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन ज्येष्ठ सिने अभिनेत्री व नृत्यांगना खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १४ सप्टेंबर) सायंकाळी ४.३० वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ उपस्थित राहणार आहेत. यांच्यासोबतच राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी एमटीडीसीचे माजी कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, पी. ए. इनामदार, कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना गुरुवारी (दि. १३ सप्टेंबर) सकाळी १० वाजता नेहरू स्टेडियम येथील हॉटेल सारस येथे एनडीएचे कमांडंट एअर मार्शल आय. पी. विपीन (व्हीएम) यांच्या हस्ते होईल. यावेळी पीएमआरडीएचे मेट्रो पॉलिटीयन कमिशनर सीईओ किरण गित्ते, अभिनेत्री प्राजक्ता माळी, मिसेस युनायटेड नेशन्य श्रद्धा कक्कड उपस्थित राहणार आहेत. उत्तुंग कामगिरीसाठी उद्घाटन सोहळ्यात दिला जाणारा 'पुणे फेस्टिव्हल यंदा बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंत गायकवाड आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना देण्यात येणार आहे. .

फेस्टिव्हलचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी दुपारी हेमा मालिनी यांच्या गणेशवंदन नृत्याने होणार आहे. ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे. प्रख्यात कथ्थक नृत्यांगनांचे नृत्य आणि महाराष्ट्र मंडळाच्या मुलामुलींची आकर्षय योग प्रात्यक्षिकेही होतील. १८ महिलांनी केलेले 'पोवाडा फ्यूजन' हे उद््घाटन सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर, ज्येष्ठ गायक सुधीर फडके आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे सादरीकरण असणारा 'स्वरांजली' कार्यक्रम, अनेक भारतीय नृत्यप्रकारांचा समावेश असणारा 'फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया' हा नृत्याविष्कार, प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र, नौशाद व जयदेव यांच्या स्मरणार्थ 'ट्रिब्यूट टू बॉलीवूड म्युझिक लिजंड्स' आदी नृत्य व संगीत कार्यक्रम ही यंदाची वैशिष्ट्ये असतील.

विक्रम गोखलेंना पुरस्कार 

विविध क्षेत्रांतील मान्यवरांना दरवर्षी 'पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड'ने गौरवले जाते. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांना यंदाच्या पारितोषिकाने सन्मानित केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment